मुंबई - एकेकाळी तिकीट देण्यासाठी प्रवाशांकडे सुट्ट्या पैशांची मागणी करणारे बेस्ट उपक्रम बस आगारांमध्ये जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या नाण्यांना कंटाळले आहे. एक, दोन, पाच, दहा रुपयांची नाणी बँकेतही घेतली जात नाहीत. त्यामुळे आता नोट्यांच्या बदल्यात ही सुट्टी व्यापरीवर्ग आता नागरिकांना देण्यात येणार आहेत.
बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून दररोज २७ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. जुलै २०१९ मध्ये बेस्ट बसगाड्यांचे किमान भाडे पाच ते २० रुपये करण्यात आले आहे. कमी अंतराच्या मार्गांवर प्रवास करणारे ६० टक्क्यांहून अधिक आहेत. बेस्ट उपक्रमाला बस भाड्याद्वारे दररोज सुमारे दोन कोटी रुपये उत्पन्न मिळते. यामध्ये एक, दोन, पाच, दहा रुपयांची लाखो नाणी दररोज जमा होत आहेत.
दररोज कोट्यवधी रुपयांची नाणी बँकांमध्ये जमा करणेही बेस्ट उपक्रमाला शक्य होत नाही. त्यामुळे हे सुट्टे पैसे बेस्टच्या तिजोरीत पडून राहत आहेत. यावर तोडगा म्हणून सुट्ट्या नाण्याची गरज असलेल्या व्यापारी अथवा नागरिकांना उच्च मूल्य वर्गाच्या बदल्यात देण्यात येणार आहे. बेस्टच्या सर्व बस आगारांमध्ये तिकीट व रोख विभागात सकाळी ९.३० ते दुपारी ४ या वेळेत हे सुट्टे पैसे मिळतील. दहा तसेच २० रुपयांच्या नोटाही बदल्यात मिळणार आहेत.