अखेर यंदाची दिवाळी कर्मचाऱ्यांसाठी ‘बेस्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:59 AM2018-11-03T04:59:50+5:302018-11-03T05:00:15+5:30
आर्थिक संकटामुळे गेली काही वर्षे बोनसपासून वंचित असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड होईल.
मुंबई : आर्थिक संकटामुळे गेली काही वर्षे बोनसपासून वंचित असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड होईल. कामगार संघटनांनी दिवाळीत संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिल्यामुळे बेस्ट प्रशासनाने साडेपाच हजार रुपये सानुग्रह अनुदानाची शुक्रवारी घोषणा केली. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील वाहतूक व विद्युत पुरवठा विभागातील ४१ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. यामुळे बेस्ट च्या तिजोरीवर २२ कोटींचा बोजा पडणार असल्याने प्रशासन पालिकेकडून आर्थिक मदत घेणार आहे.
बेस्ट उपक्रमाचा आगामी अर्थसंकल्पही ७२० कोटी रुपयांच्या तुटीत आहे. त्यामुळे यंदाही सानुग्रह अनुदान देणे शक्य नसल्याचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी स्पष्ट केले होते. याविरोधात सोमवारपासून आंदोलनाचा इशारा कामगार संघटनांनी दिला. सानुग्रह अनुदानावर कोणताच निर्णय न झाल्याने गुरुवारी बेस्ट समितीची बैठक गुंडाळण्यात आली होती. परंतु, शुक्रवारच्या बैठकीत बेस्ट प्रशासनाने सानुग्रह अनुदान मान्य केले.
गेल्या दोन दशकांपासून बेस्ट उपक्रम तुटीत आहे. कामगारांचे दर महिन्याचे वेतन देण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत होते. मात्र पालिकांकडून घेतलेले १६०० कोटी रुपयांचे कर्ज अखेर बेस्ट उपक्रमाने या वर्षी पूर्ण फेडले. त्यामुळे कर्मचाºयांना दिवाळीच्या १५ दिवस आधीच पगार मिळाला आहे. गेल्या वर्षी कर्मचाºयांना साडेपाच हजार रुपये उचल देण्यात आली होती. ही रक्कम ११ हप्त्यांमध्ये बेस्ट कर्मचाºयांच्या वेतनातून कापून घेण्यात आली होती. मात्र या वर्षी कर्मचाºयांना साडेपाच हजार रुपये सानुग्रह अनुदान महाव्यवस्थापकांनी जाहीर केले. आठ वर्षांनंतर कर्मचाºयांना बोनस मिळत असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी सांगितले.