बस थांबवली नाही म्हणून बेस्ट ड्रायव्हरला बेदम मारहाण, कलानगर येथील घटना; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 13:51 IST2024-06-24T13:51:09+5:302024-06-24T13:51:50+5:30
बेस्ट बस ड्रायव्हरला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे.

बस थांबवली नाही म्हणून बेस्ट ड्रायव्हरला बेदम मारहाण, कलानगर येथील घटना; नेमकं काय घडलं?
बेस्ट बस ड्रायव्हरला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. वांद्रे पूर्व परिसरातील कलानगर येथील बस स्टॉपवर बस थांबवली नाही म्हणून तीन जणांनी ५२ वर्षीय बळवंत खानविलकर या बेस्ट बस ड्रायव्हरला मारहाण केली. ड्रायव्हरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांचा शोध घेत नवी मुंबईच्या नेरुळ येथून एकाला अटक केली आहे. तर इतर दोघांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे.
बळवंत खानविलकर यांना चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सायन येथील पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता वांद्रे येथील कलानगर बस स्टॉपवर C-72 क्रमांकाची बस प्रवाशांनी तुडुंब भरलेली असल्यानं ड्रायव्हरनं थांबवली नाही. पुढे काही अंतरावर जाऊन सिग्नलवर बस थांबली असता तीन प्रवाशांनी बसच्या दिशेनं धाव घेतली आणि ड्रायव्हर सोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर एकानं बसचा व्हायपर तोडून बसचं नुकसान केलं. मग इतर दोघांनी थेट बस ड्रायव्हरला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीतल बस ड्रायव्हरच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जबर मार बसला. खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेत ३० वर्षीय गोरक्ष सोनावणे नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तर इतर दोघांवर कलम ३३२, ३५३, ५०४, ५०६, ४२७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
"आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून इतर दोन आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहोत.", असं पोलीस अधिकारी राजेंद्र मुळीक यांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
वांद्रे पूर्वेतील शास्त्रीनगर येथे राहणारे बेस्ट बस ड्रायव्हर बळवंत खानविलकर धारावी डेपोत ड्युटीला होते. ते बस कंडक्टर सुदाम बंजारा याच्यासोबत सी-72 मार्गावर एसी बस चालवत होते. वांद्रे कलानगर येथे पोहोचेपर्यंत बस प्रवाशांनी तुडुंब भरली होती. त्यामुळे कलानगर येथील बस स्टॉपवर खानविलकर यांनी बस थांबवली नाही. पुढे काही मीटर अंतरावर सिग्नल होता आणि तिथं बस थांबली असता तीन प्रवाशांनी बसच्या दिशेनं धाव घेतली. बस ड्रायव्हरसोबत तिघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर वादांचं रुपांतर मारहाणीत झालं. तिघांनी मिळून बळवंत खानविलकर यांना बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एका आरोपीला पकडलं, तर अन्य दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. बसचालक आणि आरोपीला खेरवाडी पोलीस ठाण्यात आणून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.