- मनीषा म्हात्रेमुंबई : रविवारी सुट्टी असल्याने मुलीने उद्यानात जाण्याचा हट्ट धरल्यामुळे, पत्नी, मुलीसह माळदकर कुटुंब बसने उद्यानाच्या दिशेने निघाले. अचानक गतिरोधकावरून बस भरधाव वेगाने गेल्याने पत्नी जोरात आदळून खाली कोसळली. आदळल्यानेतिच्या मणक्याला झटका बसला. श्वास घेण्यास अडचण येऊन ती बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बोरीवलीत घडली. बेस्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, कस्तुरबा मार्ग पोलीस तपास करत आहेत.बोरीवली पूर्वेकडील टाटा पावर येथील ओम साई सोसायटीत सुहास रमेश माळदकर (४२) हे पत्नी माया (३५) व ३ वर्षांच्या मुलीसह राहतात. माळदकर टेलरिंगचा व्यवसाय करतात, तर पत्नी लहान मुलांना साभाळण्याचे काम करीत होती. २४ तारखेला रविवार असल्याने माळदकर व त्यांच्या पत्नीला सुट्टी होती. म्हणून मुलीच्या हट्टानुसार त्यांनी तिला बोरीवलीच्या सावरकर उद्यानातून फिरवून आणण्याचे ठरविले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते निघाले. मागाठाणे बस स्थानकातून बस क्रमांक ४६१ ने उद्यानाच्या दिशेने निघाले. त्या उद्यानातील गमतीजमती माया मुलीला सांगत असतानाच, संध्याकाळी ६.१०च्या सुमारास येथील दत्तपाडा रोडवरील राजेंद्रनगरमध्ये गतिरोधकावरून बस भरधाव गेल्याने, माया जागेवरून वर उडून खाली आदळल्या. त्यांच्या मणक्याला झटका बसला, समोरील सिटवर डोके आदळले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्या चक्कर येऊन सीटवरून खाली कोसळल्या. त्यानंतर, बस मुखर्जी चौक येथील सिग्नलकडे थांबताच प्रवाशांच्या मदतीने त्यांना रिक्षामधून अरिहंत रुग्णालयात नेले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.मृत पत्नीसोबतचे ते दोन तासपत्नी बेशुद्ध झाल्याचे समजून, मुलीला कुशीत घेत मृत पत्नीला ते उठविण्याचा प्रयत्न करत होते. पुढे बस थांब्यावर उतरून पत्नीला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तरी ती जिवंतच असल्याचे सांगून तिच्यावर उपचारासाठी पतीने आग्रह धरला. त्यामुळे अखेर, दोन तासांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आणि माळदकर यांना अश्रु अनावर झाले. तर, आई कुठेय, म्हणत चिमुरडी आईला शोधत होती.प्रतीक्षा शवविच्छेदन अहवालाचीया प्रकरणी बेस्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला असून, तेथील शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानुसार, अटकेची कारवाई करण्यात येईल.- नामदेव शिंदे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे.
बेस्ट चालकाचा गतिरोधकावरचा वेग बेतला महिला प्रवाशाच्या जिवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 7:06 AM