मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला अधिकारीच आर्थिक खड्ड्यात घालत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वीजचोरीचे प्रकार वाढत असताना, संबंधितांवर दंडात्मक कारवाईऐवजी दक्षता अधिकारी तोडपाणी करत असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. बेस्टच्या दक्षता विभागाकडून माहीम येथील स्टेट्स रेस्टॉरंट आणि बारवर २१ एप्रिल २०१७ला धाड टाकून विद्युतचोरी पकडण्यात आली होती. त्यात मीटरमध्ये टेम्परिंग करण्यात आल्याचे उघड झाले होते. यामुळे अधिकाऱ्यांनी बारमालकाला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठवला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी बारमालकासोबत तडजोड करून फक्त दोन कोटी रुपये दंड वसूल केला. त्यामुळे आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बारमालकाकडून पाच कोटी रुपयांचा दंड वसूल करावा, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
तोडपाणीतून अधिकाऱ्यांची ‘बेस्ट कमाई’
By admin | Published: May 05, 2017 6:35 AM