‘इलेव्हन ईअर्स’ ठरला सर्वोत्कृष्ट

By admin | Published: March 30, 2016 01:56 AM2016-03-30T01:56:14+5:302016-03-30T01:56:14+5:30

महाराष्ट्र इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल नुकतेच रवींद्र्र नाट्य मंदिरात मुंबईत पार पडला. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, महाराष्ट्र शासनातर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात

Best of 'Eleven Years' | ‘इलेव्हन ईअर्स’ ठरला सर्वोत्कृष्ट

‘इलेव्हन ईअर्स’ ठरला सर्वोत्कृष्ट

Next

मुंबई : महाराष्ट्र इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल नुकतेच रवींद्र्र नाट्य मंदिरात मुंबईत पार पडला. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, महाराष्ट्र शासनातर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जर्मनीचा ‘इलेव्हन ईअर्स’ लघुपट आंतरराष्ट्रीय प्रवर्गात सर्वोत्कृष्ट ठरला, तर फिक्शन प्रवर्गात ‘भोपाल डायरीज’ या लघुपटाने बाजी मारली आणि ‘क्लासिक वे’ हा लघुपट सोशल अवेरनेस या प्रवर्गात सर्वोत्कृष्ट ठरला. या महोत्सवात जगभरातून तब्बल ५५० लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यातील निवडक ११२ लघुपटांचे स्क्रीनिंग महोत्सवात करण्यात आले.
महोत्सवाचे उद्घाटन थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलचे संचालक सुधीर नांदगावकर आणि अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ प्रसिद्ध दिग्दर्शक विकास देसाई आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक आशुतोष घोरपडे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी सिनेमॅटिक व्हिजन एन्टरटेन्मेंटचे संचालक अमितराज निर्मल उपस्थित होते. या महोत्सवात देशातील १६ राज्यांनी आणि इतर १७ देशांतील लघुपटांनी सहभाग नोंदवला होता.
महोत्सवात प्रा. समर नखाते यांनी ‘शॉर्ट फिल्म मेकिंग’ या विषयावर कार्यशाळा घेऊन, फिल्म मेकिंग संदर्भात उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ‘सिनेमा टेक्नॉलॉजी : पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर’ या विषयावर उज्ज्वल निरगुडकर आणि ‘अ कंपॅरीजन आॅफ इंडिअन अँड वर्ल्ड शॉर्टस्’ या विषयावर श्रीनिवास नार्वेकर यांची कार्यशाळा पार पडली. त्याचबरोबर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी, दिग्दर्शक शेखर सरतांडेल आणि दिग्दर्शक अमोल शेटगे या मान्यवरांचे ‘शॉर्ट फिल्म मेकिंग- आॅब्जेक्टिव्हज् अँड अपॉर्च्युनिटीज्’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या महोत्सवाला अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून अशोक राणे, सौमित्र पोटे आणि रीमा अमरापूरकर यांनी काम पाहिले.
या वेळी दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की, ‘लघुपटकारांसाठी स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे विविध देशांतील वेगवेगळे लघुपट एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील आणि याचा फायदा चित्रपट संस्कृती रुजण्यासाठी नक्कीच होईल. लघुपट हे सिनेमॅटिक पातळीवर उत्कृष्ट करण्यासाठी फिल्म मेकर्सनी मनापासून प्रयत्न करायला हवेत,’ असे प्रा. समर नखाते यांनी सांगितले. इंग्लंडवरून आलेला ‘लव अ‍ॅट फर्स्ट साइट’ लघुपटाचा दिग्दर्शक मार्क पेनी याने आपली फिल्म महोत्सवात नामांकित केल्याबद्दल आभार मानले, तसेच महोत्सवाच्या उत्तम आयोजनाबद्दल मनोभावे प्रशंसा केली. (प्रतिनिधी)

विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे
वर्गवारी - आंतरराष्ट्रीय
प्रथम : इलेव्हन ईअर्स : दिग्दर्शक सिमोन बेगेमोन (जर्मनी)
द्वितीय : एग्झीट राइट : दिग्दर्शक रुपर्ट होल्लर (जर्मनी)
तृतीय : व्हॉट्स अप : दिग्दर्शक होम्ब्रे फिल्म्स (स्पेन)
वर्गवारी - सोशल अव्हेरनेस
प्रथम : अ क्लासिक वे : दिग्दर्शक मोहित पराशकर (भारत)
द्वितीय : आयडेंटीटी : दिग्दर्शक अमर देवकर (भारत)
तृतीय : वुई आर रीस्पोन्सीबल : दिग्दर्शक सहदेव घोलप (भारत)
वर्गवारी - फिक्शन
प्रथम : भोपाल डायरिज : दिग्द. अर्चना बोऱ्हाडे (भारत)
द्वितीय : टी टाइम : दिग्द. राज रेवणकर (भारत)
तृतीय : वरच्या मजल्यावरची ती : दिग्द. प्रवीण कमले (भारत)

Web Title: Best of 'Eleven Years'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.