बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी !

By admin | Published: October 31, 2015 01:53 AM2015-10-31T01:53:41+5:302015-10-31T01:53:41+5:30

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टमधील कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास बेस्ट प्रशासनाने तयारी दर्शविली आहे

Best Employees Diwali! | बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी !

बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी !

Next

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टमधील कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास बेस्ट प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत होणार आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.
बेस्ट तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देणे शक्य नसल्याची भूमिका बेस्ट प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे ४६ हजार कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. कर्मचाऱ्यांना बोनस नसल्याने कर्मचारी संघटनांनीही संपावर जाण्याचा इशारा दिला होता. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने मातोश्री निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास बेस्ट प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. बेस्ट प्रशासनाने पालिकेकडून यापूर्वी १६ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. या कर्जापोटी बेस्ट महापालिकेला दरमहा व्याज देत आहे. महापालिकेने एक महिन्याचे व्याज टप्प्याने देण्यास परवानगी दिल्याने बेस्टने कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे, बेस्ट समिती अध्यक्ष अरुण दूधवडकर यांनी सांगितले. बेस्ट समितीची बैठक ३ नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये सानुग्रह अनुदान देण्याचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. बेस्ट प्रशासनाने ‘मातोश्री’ येथे वाटाघाटी केल्याने कर्मचारी कृती समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Best Employees Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.