Join us

बेस्ट कर्मचाऱ्यांनी वडाळ्यात काढला मोर्चा; 'समान काम, समान दाम'ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 1:36 PM

संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारात गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील बसगाड्या चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत बेस्ट उपक्रमात समाविष्ट करण्यात येत नाही, तोपर्यंत 'समान काम, समान दाम' द्यावा, या मागणीसाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारात गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता.

डागा ग्रुप, बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड, हंसा सिटी बस सर्व्हिसेस, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड आदी कंपन्यांमार्फत बेस्टची सेवा देणाऱ्या कामगारांच्या विविध मागण्यांकडे बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व कर्मचारी एकत्र जमले होते.

बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसवर कार्यरत असलेले बसचालक, वाहक व इतर कामगारांना सेवेत लागल्यापासून बेस्ट उपक्रमात कायम कामगार म्हणून समाविष्ट करावे, जोपर्यंत कायम केले जात नाही, तोपर्यंत 'समान काम, समान दाम' या तत्त्वावर वेतन द्यावे. कंत्राटी कामगारांनाही बेस्ट उपक्रमामधील समकक्ष, कायम आणि नियमित कामगारांना लागू असलेले वेतन व इतर सेवा सवलती तातडीने लागू कराव्या, कंत्राटी कामगारांनाही बेस्ट उपक्रमातील कायम कामगारांइतकेच सानुग्रह अनुदान द्यावे, आदी मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केल्याचे यावेळी युनियनतर्फे सांगण्यात आले.

 

टॅग्स :बेस्ट