Join us  

बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना

By admin | Published: October 21, 2015 3:54 AM

मागील तीन वर्षांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनसविना दिवाळी साजरी करावी लागत आहे. या वर्षीही बेस्ट प्रशासनाने आर्थिक डबघाईचे कारण पुढे करीत कर्मचाऱ्यांना दिवाळीला

मुंबई : मागील तीन वर्षांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनसविना दिवाळी साजरी करावी लागत आहे. या वर्षीही बेस्ट प्रशासनाने आर्थिक डबघाईचे कारण पुढे करीत कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे बेस्टचे कामगार नेते शशांक राव यांनीही या प्रकरणी बेस्टला थेट संपाचा इशारा दिला आहे. बोनस दिला नाही, तर २५ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जातील, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आता बेस्ट यावर काय भूमिका घेते? याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.मुंबईकरांसाठी अत्यंत सोयीची असलेली बेस्ट गेल्या कित्येक वर्षांपासून तोट्यात आहे. बेस्टला आर्थिक डबघाईतून सावरण्यासाठी काढलेली कर्जे, प्रवाशांना सुविधा देण्यासाठी केल्या जाणाऱ्या खर्चातून डोलारा सांभाळणे, प्रशासनाला अवघड जात आहे. कर्ज घेताना आणि कर्ज फेडताना बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या बोनसची मात्र प्रशासनाला फिकीर नसल्याचेच चित्र आहे. त्यातच मंगळवारी झालेल्या प्रशासकीय बैठकीत यंदाही बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दिवाळीच्या बोनसपोटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांवर दरवर्षी ४७ कोटी खर्च करावे लागतात. हा आर्थिक बोजाही वाढत आहे. परिणामी, २०११-१२पासून कर्मचाऱ्यांना बोनसच मिळालेला नाही. बेस्टवर १६० कोटींचे कर्ज आहे; त्या कर्जाच्या व्याजाचे हप्ते प्रशासनाला द्यावे लागत आहेत. बेस्टने महापालिकेकडून तब्बल १ हजार ६०० कोटींचे कर्ज घेतले आहे. याही कर्जाच्या व्याजाचे हप्ते प्रशासनाला फेडावे लागत आहेत. अशा अनेक आर्थिक समस्यांचा पाढा प्रशासनाने बैठकीत वाचला. त्यामुळे यंदाही बोनस देता येणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले. (प्रतिनिधी)२० टक्के बोनस हवाबेस्ट प्रशासनाच्या भूमिकेबाबत बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस सुनील गणाचार्य यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेस्ट कामगारांना २० टक्के बोनस देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय या प्रकरणी बेस्ट समिती अध्यक्षांचीही शुक्रवारी भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.