बेस्ट उपक्रम आता खासगीकरणाच्या मार्गावर, चारशे बस वाहकांच्या जागेवर कंत्राटी कामगार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:40 AM2020-01-30T01:40:31+5:302020-01-30T01:40:42+5:30
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जाहिरातीच्या निषेधार्थ बेस्ट समितीची सभा तहकूब करण्याची मागणी केली.
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने भाडे तत्त्वावर बसगाड्या घेतल्यानंतर आता ४०० बस वाहकांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बेस्ट प्रशासनाने वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. याबाबत बेस्ट समिती अंधारात असल्याने हा प्रस्ताव रद्द करण्याची सूचना सर्वपक्षीय सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली.
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जाहिरातीच्या निषेधार्थ बेस्ट समितीची सभा तहकूब करण्याची मागणी केली. प्रशासनाने वृत्तपत्रात जाहिरात देऊन ४०० बसवाहक कंत्राटी पद्धतीने एजन्सीकडून घेणार आहे. बेस्टचा इतिहासात असे पहिल्यांदाच घडत असून बेस्ट उपक्रम खासगीकरणाच्या मार्गावर असल्याचा आरोप रवी राजा केला. रिक्त जागा करण्याऐवजी प्रशासन कंत्राटी पद्धतीने कामगार घेत आहे. या खाजगीकरणाला तीव्र विरोध करीत ही जाहिरात रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
हा मुद्दा पालिका महासभेत उपस्थित करणार असल्याचेही रवी राजा म्हणाले. वाहक प्रवाशांना तिकीट देण्याचे काम करीत असल्याने त्यांच्याकडे पैसे जमा होतात. तिथे आपलाच वाहक हवा, पण आपले वाहक रस्त्यावर तिकीट कापण्यासाठी ठेवल्यामुळे अनेक बस रस्त्यावर न धावता आगारात उभ्या आहेत, असे सुनील गणाचार्य यांनी यावेळी सांगितले.
बेस्ट उपक्रमासाठी कंत्राटी कामगार भरती करून घेण्यास मान्यताप्राप्त कामगार संघटनेशी केलेला सामंजस्य करार कारणीभूत असल्याचा आरोप सुनील गणाचार्य यांनी केला.
प्रशासनाचा बचावात्मक पवित्रा
- बेस्टमध्ये १० हजार ६०० वाहक व ९ हजार ७०० चालक आहेत. ३२०० बस आहेत. त्यामुळे कर्मचारी कमी पडत असल्याने कंत्राटी वाहक घेण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण बेस्ट प्रशासनाने दिले. मात्र अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी कंत्राटी वाहक घेण्याचा निर्णय रद्द करण्याचे निर्देश देत रवी राजा यांना सभा तहकुबी मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर समितीचे कामकाज सुरू झाले.
- नियमित बसगाड्यांसाठी १२०० ते १४०० चालक व वाहक कमी आहेत. त्या गाड्या आगारांमध्ये उभ्या आहेत, असे भाजपचे श्रीकांत कवठणकर यांनी निदर्शनास आणले.
- मुंबईची काळजी असलेले मुख्यमंत्री राज्याला मिळाले आहेत. वित्तमंत्रीही दिलदार आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊन बैठक घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बबन कनावजे यांनी सुचविले.