Join us  

ग्रहणातही मुंबईकरांचा रक्षाबंधनाचा ‘बेस्ट’ उत्साह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:53 AM

बेस्टचा संप, ग्रहण या कशाचीही पर्वा न करता, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईकरांनी रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला. रक्षाबंधनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बेस्टचा संप, ग्रहण या कशाचीही पर्वा न करता, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईकरांनी रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला. रक्षाबंधनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे, दिवाळी व अन्य सणांमध्ये चीनी वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करणाºया मुंबईकरांनी यंदा जणू ‘चले जाव’ म्हणत, चीनी राख्यांवर बहिष्कार घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.रक्षाबंधनामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी गर्दी होती. प्रत्यक्ष रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारनंतर ग्रहण व वेध लागत असल्याने, अनेकांनी आदल्या दिवशी म्हणजे रविवारीच रक्षाबंधन उरकून घेतले. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी फारसा व्यवसाय होणार नाही, याची भीती विक्रेत्यांना होती, परंतु अनेक बहिणी-भावांनी ग्रहण, वेध असे काहीही न मानता, आपल्या लाडक्या भावंडांसाठी भेटवस्तू, राखी खरेदी करण्यासाठी बाजारात धाव घेतली. त्यामुळे बाजारात गर्दी होती. चॉकलेट्स, मिठाईची दुकाने यांच्यासोबतच ज्वेलर्समध्येही गर्दी पाहायला मिळाली. सकाळी बाजारांमध्ये झालेली गर्दी दुपारच्या वेळेत थोडी ओसरली, परंतु सायंकाळी पुन्हा गर्दी वाढली. प्रामुख्याने दादर, कुर्ला, लालबाग, गिरगाव येथील बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण अधिक होते.या वर्षी पारंपरिक राख्यांसोबत गोंड्यांची राखी, बांबूची राखी, देव राखी, लुंबा राखी, ब्रेसलेट राखी, कार्टून राखी, घड्याळाची राखी, रत्नजडीत राखी, जेली राखी आणि बाहुबली राखी या राख्यांना बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती. तर चीनी राख्यांवर मुंबईकरांनी बहिष्कार घातल्याचे चित्र पाहायला मिळत होते.दरम्यान, बेस्ट कामगारांच्या संपामुळे अनेकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागले. त्यामुळे उत्सवावर काहीसे विरजण पडले, पण उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. रेल्वे, मेट्रो, मोनो, आॅटोरिक्षा, टॅक्सी, अ‍ॅप बेस टॅक्सीने प्रवास करत, मुंबईकरांनी रक्षाबंधन उत्साहात साजरा केला.शेतकरी व मुस्लीम भगिनींनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखीमुंबई : रक्षाबंधनानिमित्त राज्यातल्या विविध भागातून आलेल्या शेतकरीभगिनींनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण करुन त्यांना राखी बांधली व शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शेतकºयांच्या कर्जमाफीचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा एक उपाय आहे परंतु शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आणि शेतकरी समृद्ध होईपर्यंत हा लढा चालू राहील.कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीत आपलं सरकारच्या माध्यमातून फॉर्म भरावा, असे सांगून त्यांनी सर्व महिला शेतकरी भगिनींना रक्षाबंधनानिमित शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री फडणवीस यांना भाजपा अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्या वतीने आज वर्षा निवासस्थानी राखी बांधून शुभेच्छा देण्यात आल्या. या महिलांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुपये २१ हजाराचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. खान शमिप बानो, शबाना आजम, रिझना आझम, आलिया शेख, फातमा सिद्दीकी डॉ.हैमद राणा, वसीम खान, मुनाफ पटेल आदी उपस्थित होते.