प्रवासी वाढविण्यासाठी बेस्ट अधिकारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 02:38 AM2019-07-12T02:38:11+5:302019-07-12T02:38:16+5:30
निरीक्षक हातात पाट्या घेऊन थांब्यावर : ६२ हजारांनी प्रवासी वाढले; उत्पन्नातील घटही झाली कमी
मुंबई : बस भाड्यात कपात केल्यानंतर आता प्रवासी संख्या वाढविण्याची जबाबदारी ही बेस्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. यामुळे बसचे तिकीट पाच रुपये असल्याचे प्रवाशांना कळावे, यासाठी बेस्ट निरीक्षक चक्क हातात पाट्या घेऊन बस थांब्यावर उभे दिसत आहेत. परिणामी, गुरुवारी प्रवाशांची संख्या आणखी ६२ हजारांनी वाढल्याने उत्पन्नातील घटही कमी झाली आहे.
बस भाड्यात मोठी कपात केल्यानंतर प्रवासी संख्या ४० लाखांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य बेस्ट उपक्रमाने ठेवले आहे. पूर्वी सुमारे ४२ लाख प्रवासी दररोज बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करीत होते. ही संख्या २० लाखांवर आली.
‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ने आणणार शिस्त
मुंबई : कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया आणि बेस्ट प्रशासनाच्या सहयोगाने ‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ (बेस्टकडून होणारे वाहतुकीचे उल्लंघन) ही मोहीम राबविण्यात आली आहे. सध्या ही मोहीम मुंबईमध्ये सुरू आहे. मोहिमेंतर्गत बेस्ट चालक व वाहकांकडून प्रवाशांसोबत गैरवर्तन केले जाते; त्याला आळा बसेल, असा विश्वास कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया यांनी व्यक्त केला आहे.
कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष सीताराम दीक्षित यांनी सांगितले की, सुट्टे पैसे, सामान तिकीट, बसथांब्यावर गाडी न थांबविणे, तुटलेली आसन व्यवस्था इत्यादी कारणांमुळे प्रवाशांसोबत बेस्ट चालक व वाहकांचे भांडण-तंटे होतात. काही बेस्ट चालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत.
यात झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे, लहान वाहनांना रस्त्याच्या कडेला दाबणे इत्यादी गैरवर्तन सर्रासपणे केले जाते. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी ‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ मोहीम राबविली जात आहे. बेस्टच्या चालक व वाहकांनी प्रवाशांसोबत गैरवर्तन दिसून आल्यास त्याची माहिती, छायाचित्र व चित्रफीत कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाकडे पाठवावी. त्यानंतर त्याची दखल बेस्ट प्रशासनाकडून घेतली जाईल. कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. मनोहर कामत यांनी सांगितले की, प्रवाशांनी तक्रारीसाठी कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाची हेल्पलाइन १८००२२२२६२ वर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क करावा. ७९७७१२००५९/७९७७१२००९१ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर एसएमएस किंवा मिस कॉल द्यावा. तसेच ेंँ.ँी’स्र’्रल्ली@ॅें्र’.ूङ्मे या इमेल आयडीवर माहिती द्यावी. याची नोंद कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया घेईल. पूर्वीपासून बेस्ट चालक व वाहकांच्या अनेक तक्रारी ग्राहक संरक्षण संस्थेकडे यायच्या. परंतु या तक्रारींची ठोस कारवाई होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. याला प्रतिसाद मिळाल्यास प्रवास अधिक सुखकर होईल़
सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा : प्रवाशांचे मत
मुंबई : बेस्टने दरकपात केल्याने बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. जे प्रवासी रिक्षा आणि टॅक्सीने जात होते ते बससाठी रांगा लावून प्रवास करीत आहेत. जास्तीतजास्त प्रवाशांनी बेस्टने प्रवास करून बेस्ट वाचवायला हवी, असे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
याबाबत हितेश रूपानी म्हणाले की, सर्व प्रवाशांनी जास्तीतजास्त बेस्ट बसचा वापर करायला हवा. बेस्टने ४० ते ५० टक्के भाडेकपात केली आहे. बेस्ट वाचविण्यासाठी मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुजोरी वाढली आहे. ते कित्येकवेळा भाडे नाकारतात. त्यामुळे जास्तीतजास्त बेस्ट बसचा वापर करून रिक्षा चालकांना धडा शिकवावा.
बेस्टने भाडेकपातीचा चांगला निर्णय घेतला आहे. परंतु बेस्टची सुधारणा करायची असेल तर केवळ भाडेकपात करून चालणार नाही; यासोबत अनधिकृतपणे शेअर रिक्षा, टॅक्सी चालविल्या जातात, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. तज्ज्ञांशी चर्चा करून बेस्टच्या सेवेत सुधारणा करायला हवी, असे ऋषी मारवाह यांनी सांगितले.
मनीष छडवा म्हणाले, बेस्टला स्वस्त सेवा द्यायची आहे की नवी मुंबई महापालिकेच्या बससेवेशी स्पर्धा करायची आहे़ भाडेकपात केली आहे; पण बसची संख्या कमी आहे. एसी बस दिसतच नाहीत. भाडेकपातीसोबत बसची संख्या वाढवायला हवी.
बेस्टचा तोटा कसा भरून काढणार?
बेस्ट सध्या आर्थिक संकटात आहे. इंधनाचे दर वाढले आहेत, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न आहे. तरीही भाडेकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्टची गर्दी वाढेल; पण त्यातून बेस्टला जास्त आर्थिक उत्पन्न मिळणार नाही. त्यांचे होणारे नुकसान कसे भरून काढणार आहात, असा सवाल प्रसाद संगमेश्वरण यांनी विचारला आहे.