मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी घेतलेल्या रेल्वे ब्लॉकदरम्यान प्रवाशांच्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी शनिवारी बेस्ट आणि एसटी बस चालविण्यात आल्या, मात्र त्यांची संख्या तुलनेने कमी होती. परिणामी, या पर्यायी वाहतूक व्यवस्थेवरही गर्दीचा ताण पडून प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
बेस्ट बसेसला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी बसला लटकून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. विशेषत: भायखळा, वडाळा येथून सोडलेल्या बस गर्दीने तुडुंब होत्या. काही ठिकाणी बसची प्रतीक्षा करण्यातच प्रवाशांचा बराच वेळ खर्ची पडला. त्यामुळे त्यांच्यात संतापाची भावना होती.
भर उन्हात बस प्रतीक्षा... सायन, घाटकोपर, कुर्ला परिसरातही बेस्ट बससेवेवर रेल्वे प्रवाशांचा ताण आल्याचे आढळले. ऐन गर्दीवेळी प्रवासीसंख्या अधिक होती. त्या तुलनेत बसची संख्या मात्र तोकडी होती. दुपारी १२ नंतर तर बसची संख्या आणखी कमी झाल्याने प्रवाशांना भरउन्हात घामाघूम होत १५ ते ३० मिनिटे तिष्ठत राहावे लागले.
मन:स्ताप...उपनगरांमध्ये रिक्षा, तर शहरात काही ठिकाणी शेअर टॅक्सीची सेवा असते. मात्र शनिवारी दुपारी तीही उपलब्ध न झाल्याने बेस्ट बसची वाट पाहण्याशिवाय प्रवाशांकडे दुसरा मार्ग नव्हता. दुपारी १ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत पूर्व उपनगरांतील प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सोसावा लागला.
एलबीएस मार्गावर कोंडी शुक्रवारी रात्री रेल्वे ब्लॉक सुरू असतानाच मुंबई - ठाण्याला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर कोंडी झाली होती. विशेषत: कुर्ला पश्चिमेकडील कुर्ला डेपो सिग्नलपासून विद्याविहार पश्चिमेकडील फिनिक्स माॅलपर्यंतच्या मार्गावर रात्री १२ वाजता वाहनांची रखडपट्टी झाली होती. यावेळी बेस्ट आणि शेअर रिक्षा उपलब्ध नसल्याने कामावरून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले.
लटकून प्रवास...बेस्टने रेल्वे प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी वडाळा, मुंबई सेंट्रल, भायखळा येथून अतिरिक्त बस सोडल्या होत्या. मात्र ऐन गर्दीच्या वेळी त्यांची संख्या अपुरी पडली. मात्र इच्छित ठिकाण गाठण्यासाठी गर्दीने भरून धावणाऱ्या बस पकडण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय नव्हता. अनेक ठिकाणी प्रवाशांना बसच्या दरवाजापाशी लटकून प्रवास करावा लागल्याचे चित्र होते.