मुंबईकरांवर बेस्ट भाडेवाढीचं संकट; कर्मचा-यांनाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 03:40 PM2017-10-10T15:40:08+5:302017-10-10T15:41:58+5:30
बेस्ट उपक्रमाचा सन 2018-2019 चा 880 कोटी 88 लाख रूपये तुटीचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांना बेस्ट समितीच्या बैठकीत आज सादर केला.
मुंबई- बेस्ट उपक्रमाचा सन 2018-2019 चा 880 कोटी 88 लाख रूपये तुटीचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांना बेस्ट समितीच्या बैठकीत आज सादर केला. तूट भरून काढण्यासाठी बसभाडे व बसपास दरात वाढ करण्याची शिफारस या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पुन्हा बसभाडे वाढीची कु-हाड पडणार आहे.
सन 2018-2019 या आर्थिक वर्षात 5824 कोटी 24 लाख रूपये खर्च तर उत्पन्न केवळ 4943 कोटी 37 लाख रूपये दर्शविण्यात आला आहे. आर्थिक संकट वाढ असताना मुंबई महापालिकेकडून मदतीबाबत कोणतेच ठोस आश्वासन बेस्टला मिळालेला नाही. त्यामुळे दाेन वर्षांनंतर पुन्हा बस भाड्यात वाढ करण्याची वेळ बेस्टवर आली आहे. आर्थिक बाजू कमकुवत असल्याने बेस्टला बसगाड्याही भाडेतत्वावर घ्याव्या लागणार आहेत.
भाडेतत्वावर नवीन बसगाड्या
बेस्टच्या 475 बस गाड्या 2017 ते 2019 या दोन वर्षांमध्ये मोडीत काढण्यात येणार आहेत. मात्र नवीन बस खरेदीसाठी बेस्टकडे पैसे नाहीत. त्यामळे बेस्ट चारशे बसगाड्या भाडेतत्वावर घेणार आहेत. अपंग व्यक्ती व्हिलचेअरवरून प्रवास करणे या बसगाड्यांनी शक्य होणार आहे. तसेच दोनशे मिनी साध्या बसगाड्या आणि दाेनशे मिनी वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.
उत्पन्न वाढविण्याचे उपाय
तूट भरून काढण्यासाठी चांगले उत्पन्न मिळवून देणा-या बस मार्गांवर बसगाड्या वाढविणे, बसभाडे वाढ, बसपास दरात वाढ अशी शिफारस अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
कर्मचा-यांना फटका
बेस्ट भाडेवाढबराेबरच कर्मचा-यांचे भत्ते रद्द करणे, महागाई भत्ता गाेठविणे, मनुष्यबळात कपात असेही सुचविले आहे. तसेच बेस्ट कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त बाेनस देण्यातही बेस्ट प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे.
गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प लटकला
बेस्ट उपक्रमाचा सन 2017- 2018 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला महापालिका महासभेची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. शिलकीचा अर्थसंकल्प दाखविण्याचा नियम असताना हा अर्थसंकल्प तुटीचाच दाखवून महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेने हा अर्थसंकल्प बेस्टकडे परत पाठविला हाेता. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.