बेस्टसाठी घोषणा ६ हजार कोटींची, बोळवण ८०० कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:14 AM2022-02-04T08:14:48+5:302022-02-04T08:16:09+5:30
यंदाही बेस्ट उपक्रमाच्या पदरात निराशाच पडण्याची चिन्हे
मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाला सहा हजार ६५० कोटी रुपये देण्याची तयारी महापालिकेच्या महासभेत दाखविण्यात आली. प्रत्यक्षात २०२२-२३ या आर्थिक वर्षात केवळ आठशे कोटी रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हा निधी गतवर्षीच्या तुलनेत केवळ ५० कोटी अधिक आहे. त्यामुळे यंदाही बेस्ट उपक्रमाच्या पदरात निराशाच पडण्याची चिन्हे आहेत.
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला पालिकेने गेल्या तीन - चार वर्षांत अनुदान व कर्ज स्वरुपात तीन हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र, कोविड काळात नुकसान वाढले, त्यामुळे बेस्टला वाचविण्यासाठी ६६५०.४८ कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी बेस्ट समितीकडून करण्यात आली होती. ही मागणी स्वीकारून पालिकेच्या महासभेनेही याबाबत पुढील कार्यवाहीबाबत स्थायी समितीला कळविले होते. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमाला दिलासा देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.