लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांच्या सेवेसाठी दिवसरात्र धावणाऱ्या बेस्टने दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी विशेष योजना आणली आहे. १२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही मार्गावर ९ रुपयांत ५ बसफेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना बेस्टच्या चलो ॲप या डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करावा लागणार आहे.
अत्यंत माफक दरात मुंबईकरांना सेवा देत असल्याने बेस्टला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यातच आजादी का अमृत महोत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात बेस्टने प्रवाशांसाठी विशेष ऑफर आणली. त्याला भरभरून प्रतिसाद देत सुमारे १२ लाख प्रवाशांनी या ऑफरच्या माध्यमातून प्रवास केला. आता बेस्टने दिवाळीनिमित्त मुंबईकरांना आणखी एक भेट देऊ केली आहे. त्यानुसार प्रवाशांना १२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ९ रुपयांत ५ फेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना मोबाइलवर प्रथम चलो ॲप डाऊनलोड करावे लागेल, त्यानंतर चलो ॲपमधील बस पास पर्याय निवडावा लागेल, त्यात दिवाळी ऑफर पर्याय निवडल्यानंतर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने प्रवाशांना ९ रुपये भरावे लागतील.
दिवाळी ऑफर हा पास मोबाइल ॲपवर उपलब्ध झाल्यानंतर संबंधित प्रवासी ९ रुपयांत ५ बस फेऱ्यांचा प्रवास करू शकतील. दिवाळी ऑफर बस पास प्रवास करताना मोबाइल तिकीट वाहकाला दाखवल्यास मोबाइलमध्येच प्रवास फेरीची मोबाइल पावती मिळेल. ही योजना विमानतळ मार्ग, हॉप ऑन हॉप ऑफ बस या विशेष सेवा वगळून सर्व वातानुकूलित आणि विनावातानुकूलित बसफेऱ्यांसाठी उपलब्ध असेल. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
चलो ॲप वापरणारे ३० लाख प्रवासी मुंबईकरांसाठी बेस्ट नवनवीन संकल्पना आणत असून, प्रदूषण रोखण्यासाठी बेस्टने इलेक्ट्रिक वातानुकूलित बस आणल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाने चलो ॲप या डिजिटल तिकीट प्रणालीच्या माध्यमातून सेवा सुरू केली आहे. नवरात्रोत्सवात प्रवाशांसाठी विशेष योजना उपलब्ध केल्यानंतर एक लाखाहून अधिक प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीला पसंती दिली आहे. तसेच आतापर्यंत ३० लाख प्रवाशांनी चलो ॲप डाऊनलोड केले आहे.