Join us

Best Bus: महिलांना ' बेस्ट ' भेट...बसमध्ये प्रवेश करताना लेडीज फर्स्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 6:30 PM

Best Bus For women: बेस्ट उपक्रमाच्या बसभाड्यात २०१९ मध्ये मोठी कपात करण्यात आली. त्यानंतर बेस्ट बस गार्डन मधील प्रवासी संख्या वाढली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - बेस्ट बसगाड्यांमध्ये महिलांसाठी १२ आसने राखून ठेवण्यात आली आहेत. मात्र आता बसमध्ये प्रवेश करतानाही महिला प्रवाशांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी महिलांकरीता स्वतंत्र रंगांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तूर्तास दक्षिण मुंबईमध्ये एका बस मार्गावर ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास आणखी काही बसमार्गावर महिलांसाठी स्वतंत्र रंगांची व्यवस्था केली जाणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या बसभाड्यात २०१९ मध्ये मोठी कपात करण्यात आली. त्यानंतर बेस्ट बस गार्डन मधील प्रवासी संख्या वाढली. सद्यस्थिती बेस्टमधून दररोज २७ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. याद्वारे दोन कोटी १५ लाख रुपये उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत दररोज जमा होत आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बेस्टकडूनही प्रवाशांसाठी जादा बसगाड्या, बस फेऱ्यांमध्ये वाढ आणि अन्य नियोजन बेस्ट प्रशासनमार्फत सुरू आहे.

महिलांना प्रवेशात प्राधान्य....

बेस्ट बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये महिलावर्गाची संख्याही अधिक आहे. मात्र गर्दीच्या मार्गावर, वर्दळीच्या वेळी बेस्ट बसमध्ये प्रवेश करताना होणारी गर्दी, धक्काबुकी आदींमुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत असते. त्यामुळे महिलांना बेस्ट बसमध्ये प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महिलांच्या रांगा स्वतंत्र असणार आहेत. 

येथे सुरू प्रयोग...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बॅकबे आगार (कुलाबा) दरम्यान १३८ क्रमांकाची बस धावते. सकाळी व सायंकाळी या बससाठी सुरुवातीच्या थांब्यापासून मोठी गर्दी असते. यामध्ये महिलांची संख्याही अधिक असते. त्यामुळे या बसमार्गावर हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार महिलांसाठी स्वतंत्र रांग करण्यात आली आहे. त्याच्या नियोजनासाठी बेस्ट कर्मचारीही तैनात करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास दक्षिण मुंबईतील आणखी काही गर्दीच्या बसमार्गावरही महिला प्रवाशांना प्रथम प्राधान्य मिळेल.

टॅग्स :बेस्टमहिला