बेस्टकडे आणखी ४० इलेक्ट्रिक बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:33 AM2018-03-28T01:33:01+5:302018-03-28T01:33:01+5:30
केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून बेस्ट उपक्रमाने यापूर्वी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ४० बस भाड्याने घेतल्या होत्या.
मुंबई : केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून बेस्ट उपक्रमाने यापूर्वी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ४० बस भाड्याने घेतल्या होत्या. त्यानंतर आता आणखी ४० इलेक्ट्रिक मिडी वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला.
बेस्ट समितीने यापूर्वी २० बिगर वातानुकूलित बसगाड्या व २० वातानुकूलित मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या केंद्राच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मान्यता दिली होती. अशा एकूण १०० बसगाड्या घेण्यासाठी बेस्टने आपला प्रस्ताव पाठविला होता. सात वर्षांच्या कालावधीसाठी या बसगाड्या भाड्याने घेण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकार ६० टक्के अनुदान देणार आहे.
या एका बसगाडीची किंमत सरासरी एक कोटी ६७ लाख रुपये आहे. त्यातील एक कोटी रुपये बेस्टला अनुदान स्वरूपात मिळणार
आहेत. म्हणजे एकूण ४० कोटी रक्कम बेस्टला मिळणार आहे. या बसगाडीच्या बॅटरीचा खर्च हा बसच्या किमतीच्या ६० टक्के आहे. आयात केलेले महागडे भाग या बसगाडीवर बसविले आहेत.
बसगाड्यांची वैशिष्ट्ये
संपूर्ण वातानुकूलित बसगाड्या
या बस धूर सोडत नाहीत
या बसचा आवाज कमी असल्यामुळे प्रवाशांना आवाजविरहित प्रवासाचा अनुभव
इतर बसगाड्यांच्या तुलनेत कमी देखभालीची आवश्यकता
बसगाडीच्या प्रवर्तनामध्ये घट