पालिकेकडून मिळणारी ‘बेस्ट’ मदत दिवास्वप्नच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:12 AM2017-08-01T03:12:03+5:302017-08-01T03:12:08+5:30

बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पालिका मुख्यालयात आज पार पडलेली पाचवी बैठकही निष्फळ ठरली.

The 'Best' help weekdream from the corporation | पालिकेकडून मिळणारी ‘बेस्ट’ मदत दिवास्वप्नच

पालिकेकडून मिळणारी ‘बेस्ट’ मदत दिवास्वप्नच

Next

मुंबई : बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पालिका मुख्यालयात आज पार पडलेली पाचवी बैठकही निष्फळ ठरली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मध्यस्थीनंतरही यावर तोडगा निघत नसल्याने बेस्ट कामगार हवालदिल झाले आहेत. महापालिकेने बेस्टच्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडावी या मागणीसाठी उद्यापासून बेस्टच्या वडाळा आगारासमोर कामगार नेते बेमुदत उपोषणाला तर कर्मचारी साखळी उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या आर्थिक मदतीचा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
आर्थिक मदत देण्याआधी बेस्टने कृती आराखडा सादर करावा, अशी अट पालिका प्रशासनाने घातली होती. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यात मात्र कामगारांवर संकट ओढावले. स्वेच्छानिवृत्ती, भत्त्यांमध्ये कपात सुचवणाºया या आराखड्याला विरोध सुरू झाला.
वादग्रस्त ठरलेला हा आराखडा लांबणीवर पडला असून, बेस्टची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कामगारांचा दर महिन्याचा पगार देणेही बेस्टसाठी अवघड झाले आहे. यामुळे कामगार आंदोलनाच्या तयारीत आहेत. या आंदोलनात स्वपक्षीय संघटनाही उतरली असल्याने शिवसेना अडचणीत आली आहे.
मात्र यावर मार्ग काढण्याचे महापौरांचे प्रयत्नही फेल गेले आहेत. पालिका अधिकारी आणि बेस्ट प्रशासनामधील पाचवी बैठकही आज निष्फळ ठरली आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी सादरीकरण केले. मात्र त्यात कर्मचारी बचाव भूमिका नसल्याने बैठकीत काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे कामगार संघटनांचे पदाधिकारी उद्यापासून सकाळी ९ वाजता उपोषणाला सुरुवात करणार आहेत, असे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले. कामगार नेते बेमुदत उपोषण तर कर्मचारी आपापली ड्युटी झाल्यावर साखळी उपोषणामध्ये सामील होणार आहेत.
महापौरांचे कामगारांना आवाहन
बेस्टबाबतच्या आजच्या बैठकीत तोडगा निघालेला नाही. महाव्यवस्थापक आणि आयुक्त यांनी एकत्र बसून तोडगा काढावा, असे आदेश देण्यात आले आहेत. कायमस्वरूपी नियोजनासाठी आयुक्त धोरण आखणार आहेत. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प समाविष्ट करण्याची भूमिका शिवसेनेने मांडली आहे. १० आॅगस्टला पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बेस्ट कर्मचाºयांनी साखळी उपोषण करू नये, असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे.
शिवसेनेवर विरोधी पक्षांचे शरसंधान
महापालिका बेस्ट उपक्रमाची पालक संस्था आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची तयारी पालिकेने दाखवली होती. मात्र बैठकांवर बैठका होऊनही तोडगा निघत नसल्याने मदत करण्याची पालिकेची इच्छा दिसत नाही, असा संशय विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बेस्ट कामगारांचे उपोषण किंवा संप झाल्यास त्यासाठी शिवसेना आणि पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
 

Web Title: The 'Best' help weekdream from the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.