Join us

बेस्ट भाडेवाढीचे संकट कायम!

By admin | Published: November 19, 2014 2:22 AM

निवडणुकीच्या काळात बेस्ट उपक्रमाला १५० कोटी रुपये देऊन सत्ताधारी शिवसेनेने टाळलेली बेस्ट भाडेवाढ अखेर फेब्रुवारी व एप्रिल २०१५ मध्ये लागू होण्याची चिन्हे

मुंबई : निवडणुकीच्या काळात बेस्ट उपक्रमाला १५० कोटी रुपये देऊन सत्ताधारी शिवसेनेने टाळलेली बेस्ट भाडेवाढ अखेर फेब्रुवारी व एप्रिल २०१५ मध्ये लागू होण्याची चिन्हे आहेत़ म्हणजेच दोनदा भाववाढ होण्याची शक्यता आहे. यापैकी एका भाडेवाढीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी गतवर्षीप्रमाणे दीडशे कोटी अनुदान द्या, अशी गुगलीच बेस्टने पालिकेपुढे टाकली आहे़ त्यामुळे अनुदान मिळाले तर किमान भाडे सहा ते सात रुपये व अनुदान नाकारल्यास सहा ते आठ रुपये होणे अटळ आहे़बेस्ट उपक्रमाने सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ९४६ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक दाखवले होते. मात्र कामगारांची थकबाकी आणि कर्जाची परतफेड करण्यातच ही रक्कम खर्च होत असल्याने पुढच्या वर्षी दोनवेळा भाडेवाढ प्रस्तावित आहे़ त्यानुसार तिकिटांच्या दरात दोन रुपये तर मासिक पासमध्ये ३० ते ४० रुपये वाढ करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे़ बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी अर्थसंकल्पीय चर्चेवेळी ही माहिती दिली़ अर्थसंकल्प शिलकी असल्यानंतरही बेस्टचे आर्थिक दुखणे संपलेले नाही़ त्यामुळे दोनदा भाडेवाढ करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे़