‘रेल रोको’मुळे ‘बेस्ट’ हाउसफुल्ल; तब्बल ११५ अधिकच्या बेस्ट बस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:04 AM2018-03-21T00:04:39+5:302018-03-21T00:04:39+5:30
पिक अवरला मध्य रेल्वेवर ‘रेल रोको’ झाल्याने वाहतूकसेवा कोलमडली. परिणामी, या सेवेचा भार बेस्टसह उर्वरित वाहतूक प्रणालीवर पडला. प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल ११५ अधिकच्या बेस्ट बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या.
मुंबई : पिक अवरला मध्य रेल्वेवर ‘रेल रोको’ झाल्याने वाहतूकसेवा कोलमडली. परिणामी, या सेवेचा भार बेस्टसह उर्वरित वाहतूक प्रणालीवर पडला. प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल ११५ अधिकच्या बेस्ट बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. रस्ते प्रवासाला मुंबईकरांनी प्राधान्य दिल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली.
घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला आणि सायन येथून अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझ आणि विलेपार्ले येथे जाणाऱ्या बेस्ट बसमध्ये मुंबईकर प्रवाशांची तुफान गर्दी झाली. घाटकोपर आणि कुर्ला येथून अंधेरीकडे जाणारी प्रत्येक बेस्ट बस प्रवाशांनी ओव्हरफ्लो झाली होती. विशेषत: कुर्ला आणि घाटकोपर येथून कमानीमार्गे जाणाºया सर्वच बेस्ट बस प्रवाशांनी खच्चून भरल्या होत्या. अंधेरीसह वांद्रे, सांताक्रुझ आणि विलेपार्ले येथे जाणाºया बेस्ट बसमध्येही तुफान गर्दी होती.
दुसरीकडे बेस्ट बसला प्रवाशांची गर्दी होत असतानाच, रिक्षा आणि टॅक्सीकडेही प्रवासी वाढत होते. मुंबई-ठाणे मार्गाला जोडणाºया लाल बहादूर शास्त्री मार्गावर झालेल्या वाहतूककोंडीने, मुंबईकर प्रवाशांच्या त्रासात आणखी भर घातली. कमानी जंक्शन, शीतल तलाव, कुर्ला डेपो, बैलबाजार रस्ता, साकीनाका जंक्शन, कुर्ला-अंधेरी रोड, काळे मार्ग, वांद्रे-कुर्ला संकुलाचा प्रवेश मार्ग, सांताक्रुझकडे जाणारा एअरपोर्ट रोड; अशा प्रमुख रस्त्यांवर ऐन पीक अवरला झालेल्या कोंडीने प्रवाशांची आणखी कोंडी झाली.
बेस्टकडून दिवसभरात वडाळा, आणिक, मरोळ, ओशिवरा, विक्रोळी, वांद्रे अशा विविध आगारांतून तब्बल ११५ अधिकच्या बेस्ट बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. तरीही रेल्वेच्या तुलनेत ही सेवा तोकडी पडल्याचे चित्र होते. पूर्व उपनगरात सर्वच बेस्ट स्थानकावर गर्दी झाली होती. प्रवाशांना बेस्टमध्ये पाय ठेवण्यास जागा नव्हती. रेल्वे सेवा पूर्वपदावर आल्यानंतरही दुपारी २ वाजेपर्यंत बेस्ट बससह उर्वरित वाहतूक सेवांवर पडलेला ताण कायम होता.