वांद्रे-कुर्ला संकुलात धावणार ‘बेस्ट’ हायब्रीड बस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:55 PM2017-08-18T18:55:06+5:302017-08-18T18:55:13+5:30
वातानुकूलित बस सेवा बंद, तासंतास बस थांब्यावर प्रतीक्षा यामुळे वैतागलेल्या बेस्टच्या प्रवाशांना गुड न्यूज आहे. आरामदायी आसन सेवा, थंडगार प्रवास, मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग आणि धक्के न बसणारी ‘हायब्रीड’ बस
मुंबई, दि. 18 - वातानुकूलित बस सेवा बंद, तासंतास बस थांब्यावर प्रतीक्षा यामुळे वैतागलेल्या बेस्टच्या प्रवाशांना गुड न्यूज आहे. आरामदायी आसन सेवा, थंडगार प्रवास, मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग आणि धक्के न बसणारी ‘हायब्रीड’ बस लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होत आहे. याचा प्रयोग वांद्रे-कुर्ला संकुलातून होणार आहे. बीकेसीत कामानिमित्त दररोज धक्के खात बसमध्ये लटकत येणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही सेवा पुढच्या महिन्यापासून सुरु होत आहे.
वांद्रे कुर्ला संकुलात दररोज हजारोंच्या संख्येने चाकरमानी नोकरीधंद्या निमित्त येत असतात. मात्र वांद्रा, कुर्ला आणि शिव या ठिकाणाहून बीकेसीत पोहोचण्याचा प्रवास त्यांच्यासाठी तापदायक ठरतो. त्यामुळे बीकेसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) बेस्ट उपक्रमाला २५ हायब्रीड या अत्याधुनिक बस देणार आहे.
या बसची देखभाल आणि उत्पन्नाबाबत बेस्ट आणि एमएमआरडीए यांच्यात झालेल्या कराराला मंजुरी मिळाली आहे. या बसची प्रवासी क्षमता ५९ इतकी आहे. ३१ प्रवासी बसून २८ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकणार आहेत. या बसगाड्यामुळे बेस्टला उत्पन्न तर मुंबईकरांना आरामदायी प्रवास मिळणार आहे. तसेच या गाड्या चालविण्यात नुकसान झाल्यास त्याची भरपाई ‘एमएमआरडीए’ने देणार आहे.
अशी आहे ‘हायब्रीड’ बस सेवा...
‘हायब्रीड’ बसमध्ये वापरण्यात येणार्या डिझेलचे रूपांतर इलेक्ट्रिक उर्जेमध्ये होणार आहे. या बसमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. वातानुकूलित बसगाड्या बंद करण्यात आल्यामुळे हायब्रीड बस सेवा त्याला उत्तम पर्याय ठरणार आहे.
- हायब्रीड बसचे चालक व वाहक बेस्टचे असून त्यांचा पगारही बेस्टच देणार आहे.
- ‘बेस्ट’चे उत्पन्न वाढणार असून गाड्यांची देखभाल ‘एमएमआरडीए’ करणार आहे.
- ... तिन्ही मार्गांवर २५ बस धावणार असल्यामुळे रिक्षावाल्यांकडून होणारी लूट थांबणार आहे.
‘बीकेसी’त हजारोंच्या संख्येने येणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी या बस फायदेशीर ठरणार आहेत. विशेष म्हणजे या बस चालवताना ‘बेस्ट’वर कोणताही आर्थिक भार येणार नाही. या गाड्या चालवििण्यात नुकसान झाल्यास उत्पन्नाची भरपाई ‘एमएमआरडीए’च करणार आहे.
- अनिल कोकीळ, अध्यक्ष, ‘बेस्ट’ समिती