मुंबई: तिकीट दरात मोठी कपात करुन प्रवाशांना दिलासा देणाऱ्या बेस्टनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांचा प्रवास स्वस्त करणाऱ्या बेस्टनं आता बेस्टची वीज वापरणाऱ्यांसाठी अभय योजना आणली आहे. यामुळे वीज बिल थकवल्यानं वीज मापक काढून टाकण्याची कारवाई झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळेल. बेस्टनं गेल्या वर्षी आणि यंदाच्या वर्षातही अभय योजना लागू करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही योजना राबवण्यात येणार आहे. अभय योजनेच्या अंतर्गत थकीत वीज बिलावरील १०० टक्के व्याज आणि विलंबित आकार रद्द केला जाणार आहे. १ ऑक्टोबर २००६ ते ३१ डिसेंबर २०१५ या दरम्यान वीज देयकाची थकबाकी न भरल्यानं वीज मापक (मीटर) काढण्यात आलेल्या सर्व ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेला अभय योजना २०१९ असं नाव देण्यात आलं आहे. पूर्वीच्या अभय योजनेच्या समाप्तीनंतर म्हणजेच ३१ मार्च २०१९ ते ९ जुलै २०१९ या कालावधीत प्राप्त झालेले अर्जदेखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रभागाच्या विभागीय अभियंता ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याचं आवाहन बेस्टकडून करण्यात आलं आहे.याआधी १ फेब्रुवारी २०१८ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत बेस्टनं अभय योजना २०१८ राबवली होती. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत पुन्हा एकदा ही योजना राबवली. आता १० जुलै २०१९ ते ९ जुलै २०१० दरम्यान अभय योजना राबवण्यात येणार आहे. वर्षभरासाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ शेकडो ग्राहकांना होईल, अशी बेस्टला आशा आहे.
५ रुपयांच्या तिकीटानंतर बेस्टचा आणखी एक 'बेस्ट' निर्णय; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 5:04 PM