‘बेस्ट’ भाडेकपातीमुळे प्रवाशांना ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:37 AM2019-07-10T00:37:21+5:302019-07-10T00:37:50+5:30

किमान पाच रुपये तिकीट दरामुळे प्रवाशांचा ओढा : शेअर रिक्षा, टॅक्सीला फटका, प्रवासी संख्या अजून वाढण्याची शक्यता

'Best' lease gives passengers 'good days' | ‘बेस्ट’ भाडेकपातीमुळे प्रवाशांना ‘अच्छे दिन’

‘बेस्ट’ भाडेकपातीमुळे प्रवाशांना ‘अच्छे दिन’

Next

मुंबई : महागाई वाढत असताना सार्वजनिक वाहतूक सेवा स्वस्त झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेस्टचा प्रवास अवघ्या पाच रुपयांत असल्याने पहिल्याच दिवशी बसथांब्यावर प्रवाशांची गर्दी उसळली. रांगा लावून प्रवासी बसगाड्यांमध्ये चढत असल्याचे मुंबईत काही ठिकाणी मंगळवारी दिसून आले.


बेस्ट बसगाड्यांमधून एकेकाळी दररोज ४२ लाख मुंबईकर प्रवास करत होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या संख्येत घट होऊन ही संख्या २२ लाखांवर आली आहे. यामुळे उत्पन्नामध्येही मोठी घट झाली आहे. बेस्टच्या ताफ्यात बसगाड्यांची संख्या कमी होत गेल्यामुळे प्रवासी शेअर रिक्षाकडे वळले. याचा मोठा फटका बेस्ट उपक्रमाला बसला.


मात्र प्रवासी भाड्यात कपात होताच आज हेच चित्र बदलल्याचे दिसून आले. शेअर रिक्षाचे किमान भाडे १० रुपये व त्याहून जास्त असल्याने प्रवासी मोठ्या संख्येने बसथांब्यांवर बसची प्रतीक्षा करताना दिसून येत होते.
वांद्रे-कुर्ला संकुल येथे वातानुकूलित बसगाडीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली होती, असे प्रशासनाने बेस्ट समितीच्या बैठकीत सांगितले.

नोव्हेंबरपर्यंत नवीन बस ताफा
बेस्ट उपक्रमाकडे सध्या ३३३७ बस आहेत. या बसगाड्यांमध्ये कपात करणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने याआधीच दिले आहे. यामध्ये आणखी ५३० बसगाड्यांची भर पडणार आहे. यामध्ये ८० इलेक्ट्रिक बसगाड्यांचाही समावेश असणार आहे. या बसगाड्यांसाठी कार्यादेश देण्यात आला असून, नोव्हेंबरपर्यंत त्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित आहे.


बेस्ट भाडेकपातीचे बोरीवली-दहिसरमध्ये पेढे भरवून स्वागत
बेस्ट प्रवाशांसाठी मंगळवारपासून स्वस्त दरात प्रवास सुरू झाल्यामुळे बोरीवली-दहिसरमध्ये पेढे वाटून स्वागत करण्यात आले. म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर व शिवसैनिकांनी बोरीवली (पश्चिम) आय. सी. कॉलनी तसेच दहिसर कांदरपाडा भागात फटाके वाजवत निर्णयाचे स्वागत केले. याप्रसंगी कांदरपाडा येथून सुटणारी बस क्रमांक २४५ मधील बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांना गुलाबाचे फुल देत व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच बोरीवली-दहिसर भागात प्रवाशांनी रिक्षाकडे पाठ फिरवत बेस्ट बस थांब्यांवर गर्दी केली होती.


रिक्षा चालकांच्या लूटीला चाप
माहुल ते कुर्ला पूर्वी १८ रुपये तिकीट होते ते आता १० रुपयांवर आले आहे. परंतु अनेकदा गाड्या कमी असल्याने रिक्षाने जावे लागते. काही रिक्षाचालक जवळचे भाडेही नाकारतात. गाड्या वाढविल्यास प्रवाशांना वेळेत पोहोचणे शक्य होईल आणि रिक्षा चालकांच्या मुजोरीला चाप बसेल. - सुमित गांगुर्डे, प्रवासी
स्वागतार्ह निर्णय
पूर्वी गोवंडी ते कुर्ला १८ रुपये तिकीट होते़ परंतु बेस्टने आता तिकीट दरात कपात केली आहे. प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. हा नक्कीच स्वागतार्ह निर्णय आहे. - ए एन इर्शाद, प्रवाशी

मुंबईत फिरा
५० रुपयात कुठेही...

मुंबईत कुठेही प्रवास करण्याची मुभा असलेला दैनंदिन बस पास सर्वसाधारण बसगाड्यांसाठी ५० रुपये तर वातानुकूलित ६० रुपये करण्यात येणार आहे.
प्रवासी वाढविण्याचे लक्ष्य...
बस भाड्यामध्ये तब्बल ६० ते ७० टक्के कपात झाली आहे. यामुळे बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात मोठी घट होईल, यासाठी प्रवासीवर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची अट पालिकेने घातली आहे. सध्या बेस्ट बसगाड्यांमधून २० लाख प्रवासी प्रवास करतात. ही संख्या दुप्पट म्हणजे ४० लाखांवर नेण्याचे आव्हान बेस्ट उपक्रमापुढे आहे.

Web Title: 'Best' lease gives passengers 'good days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट