- शेफाली परब-पंडितमुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ बसचा प्रवास आता खऱ्या अर्थाने ‘स्वस्त व सुरक्षित’ होणार आहे. अनेक आंदोलने व वाटाघाटीनंतर मुंबई महापालिकेने आपले दायित्व स्वीकारत बेस्टसाठी ६०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमानेही पालिकेच्या अटीनुसार मुंबईकरांचा प्रवास स्वस्त केला आहे. गेल्या काही वर्षांत दूर गेलेला प्रवासीवर्ग भाडेकपातीमुळे पुन्हा बेस्टकडे वळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. मात्र बसताफा आणि प्रवासी संख्या ४० लाखांपर्यंत वाढविणे, वाहतूककोंडीतून बेस्टसाठी स्वतंत्र मार्ग काढणे आणि खर्चावर नियंत्रण आणण्याचे आव्हान बेस्ट प्रशासनापुढे आहे. अन्यथा आधीच तोट्यात असलेल्या बेस्टला तुटीच्या खाईत लोटल्यासारखे होईल.‘ना तोटा, ना नफा’ या तत्त्वावर चालणाºया बेस्ट या सार्वजनिक वाहतूक उपक्रमाची गेल्या दोन दशकांत वाताहत झाली. काही चुकीच्या प्रयोगांमुळे बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित फसले. जुन्या झालेल्या बसगाड्या बंद पडणे, वाहतूककोंडीमुळे बसगाड्यांना विलंब होणे अशा प्रकारांमुळे बस थांब्यावर तिष्ठत राहणारा प्रवासी रिक्षा-टॅक्सी व खाजगी वाहतुकीकडे वळला. हळूहळू सर्व बस मार्ग तोट्यात गेले. यामुळे काही बस मार्ग बंद करावे लागले. कर्जाचे डोंगर व तूट सतत वाढत असल्याने बेस्ट उपक्रमाला टाळे लावण्याची वेळ आली.
बेस्टला वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न गेले वर्षभर महापालिकेत सुरू होते. अखेर गेल्या महिन्यात या प्रयत्नांचे फळ बेस्ट उपक्रमाला मिळाले. आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पहिल्याच बैठकीत बेस्टला जीवदान देणार, असे आश्वासन दिले. पालिकेच्या अटीनुसार बेस्ट उपक्रमाने भाडेकपात करून पाच, १०, १५ आणि २० असे चारच टप्पे ठेवले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे घर ते रेल्वे स्थानक अशा कमी अंतरावरील ७० टक्के प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र महागाईचा दर वाढत असताना भाडेकपात म्हणजे बेस्ट उपक्रमाच्या तुटीत आणखी भर टाकण्यासारखे आहे. यासाठी भाडेकपात करीत असताना प्रवासी वर्ग दुप्पट वाढणेही अत्यंत गरजेचे आहे.
एकेकाळी बेस्ट बसगाड्यांमधून दररोज ४२ लाख प्रवासी प्रवास करीत होते. रिक्षाचे किमान भाडे १८ रुपये, तर बेस्टचे किमान प्रवासी भाडे आठ रुपये आहे. मात्र बसगाड्या वेळेवर येत नसल्याने सकाळी कामावर जाण्याच्या धावपळीत असलेला सर्वसामान्य मुंबईकर रिक्षाने प्रवास करू लागला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेअर रिक्षा-टॅक्सी तेजीत चालू लागल्या. त्याचा मोठा फटका बेस्टच्या उत्पन्नाला बसला. सध्या बेस्टकडे दररोजचे केवळ २० लाख प्रवासीच उरले आहेत.
भाडेकपात केल्यानंतर बेस्टचे उत्पन्न आणखी अर्ध्यावर येईल. मोठ्या संख्येने प्रवासी वाढल्यास जादा बसगाड्यांची व्यवस्था तातडीने करण्याचीही गरज आहे. बेस्टचा ताफा तीन महिन्यांत सहा हजारांपर्यंत वाढविण्याची अट महापालिकेने ठेवली आहे. बेस्टच्या ताफ्यात सध्या ३,३३७ बसगाड्या आहेत. तर कार्यादेश दिलेल्या ५३० बसगाड्यांचा ताफा बेस्ट उपक्रमात दाखल होण्यास नोव्हेंबर महिना उजाडणार आहे. मात्र भाडेकपात लवकरच लागू होणार असल्याने प्रवासीवर्ग वाढल्यास बेस्टपुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे कमी वेळेत बेस्ट उपक्रमाला जादा बसगाड्यांचा ताफा तैनात ठेवावा लागणार आहे.
दुसरी मोठी अडचण म्हणजे मुंबईतील वाहतूककोंडी. बसगाड्या वाहतूककोंडीत तासन्तास अडकतात. त्यामुळे बस वेळेत थांब्यावर व इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होतो. प्रवाशांना जलद प्रवास अपेक्षित असल्याने स्वतंत्र मार्गिका वाहतूककोंडीवरचा कायमस्वरूपी उपाय ठरेल. मात्र यापूर्वीचे प्रयोग फेल गेल्यामुळे नियोजनपूर्वकच नवीन स्वतंत्र मार्गिका बेस्ट उपक्रमाला आणाव्या लागतील. कमी वेळेत जास्त बस फेºया असल्यास प्रवासी निश्चितच बेस्ट बसगाड्यांनाच पसंती देतील. भाडेकरारावरील बसगाड्यांमुळे तूट कमी होऊ शकेल. तसेच वातानुकूलित बसगाड्यांच्या भाड्यातही कपात होणार असल्याने रस्त्यावरील खाजगी वाहनांची संख्या कमी होईल. यामुळे कोंडी कमी होऊन पर्यावरण व मुंबईकरांचे आरोग्यही चांगले राहील.