बेस्टला वर्षाला ९०५ कोटींचा तोटा
By admin | Published: August 30, 2016 03:37 AM2016-08-30T03:37:03+5:302016-08-30T03:37:03+5:30
महानगरातील एक प्रमुख वाहतूक यंत्रणा असलेल्या बेस्ट बसला संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ९०५.३ कोटीचे नुकसान सोसावे लागले आहे.
मुंबई : महानगरातील एक प्रमुख वाहतूक यंत्रणा असलेल्या बेस्ट बसला संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ९०५.३ कोटीचे नुकसान सोसावे लागले आहे. रोज एका प्रवाशामागे बेस्टला सरासरी ८ रुपये ५३ पैसे भुर्दंड सोसावा लागत असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. बेस्टमधून रोज २९ लाख ७ हजार ८० प्रवासी ये-जा करतात. एका प्रवाशासाठी २१. ४१ रुपये खर्च येतो. त्यातून अवघे १२.८८ रुपये मिळत असून प्रवाशांची संख्या घटत असल्याने खर्चाची रक्कम वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ‘बेस्ट’कडे बस प्रवासी संख्या, उत्पन्न आणि बस प्रवर्तनाकरिता होणाऱ्या खर्चाची माहिती मागितली होती. त्याबाबत प्रशासनाने कळविले आहे की, २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण १०६ कोटी १० लाख ८४ हजार नागरिकांनी बसमधून प्रवास केला. त्यातून १३६७.११ कोटी उत्पन्न मिळाले. तर बस प्रवर्तनाकरीता एकूण २२७२.४१ कोटी इतका खर्च आला. त्यामुळे ९०५ कोटींचा तोटा झाला आहे.
भाडेवाढ मुंबई महापालिकेने २०१४-१५मध्ये १५० कोटी रुपये अनुदान दिले होते. त्यानंतर मात्र महापालिकेने काहीही सहाय्य केले नाही. त्यामुळे तोट्याचे प्रमाण वाढले आहे.