मुंबई : मुंबईकरांना सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवीत असलेली बेस्ट दिवसागणिक तोट्यात जात असून, सध्या हा तोटा २ हजार २५० कोटी रुपये आहे. मात्र आता या तोट्यास बेस्टच्या बसगाड्या वाहतूक कोंडीत सापडणे, रस्त्यांच्या कामाचा बेस्ट बसला फटका बसणे, ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे बेस्ट बसला गंतव्य ठिकाणी जाण्यास वेळ लागणे; या घटकांमुळे प्रवासी बेस्ट व्यतिरिक्त असलेल्या वाहनसेवेकडे वळत आहेत, असे म्हणणे बेस्ट प्रशासनाने मांडले आहे.
बेस्ट प्रशासनाला ३ हजार ३३२ गाड्या चालवितानाच नोव्हेंबरपर्यंत १ कोटी ७०,५७,५७७ किलोमीटरपर्यंत प्रवासी टप्पा गाठायचा होता. मात्र विविध कारणांनी ४२,७३,४७० किलोमीटर गाठता आले. परिणामी २३.७६ टक्के अंतर लक्ष्य गाठण्यास कमी पडले. या कारणात्सव आता बेस्टने ही कारणे देऊ नये, तर या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काय उपाय योजता येतील याकडे लक्ष द्यावे, असे म्हणणे बेस्ट समितीने मांडले आहे. कमी लक्ष्य ज्या डेपोने गाठले आहे त्यामध्ये दिंडोशी, गोरेगाव, मालवणीचा समावेश असून, व्यवस्थित लक्ष्य गाठण्यात कुलाबा आणि वांद्रे डेपोचा समावेश आहे. दुसरीकडे तोटा करण्यासाठी सर्व स्तरांवर उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.मेट्रोच्या कामासाठी रिक्षा स्टॅण्ड रद्दमुंबई : शहरात अनेक ठिकाणी मेट्रो आणि रस्त्यांच्या कामांसाठी रिक्षा आणि टॅक्सीचे स्टॅण्ड बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांना इतर ठिकाणी रिक्षा उभ्या कराव्या लागत असून त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यामुळे रद्द केलेल्या स्टॅण्डला पर्यायी व्यवस्था करून द्या, अशी मागणी रिक्षा टॅक्सी संघटनेने केली आहे. याबाबत रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष राजन देसाई म्हणाले, बेस्टने भाडे कपात केल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ज्या ठिकाणी रिक्षाचे स्टॅण्ड असते तेथे प्रवासी येतात. पण स्टॅण्ड बंद केल्यामुळे इतर ठिकाणी पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली नाही.