Join us  

मुंबईतील बेस्ट कर्मचा-यांचा संप मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2017 4:44 PM

मुंबईतील बेस्ट  कर्मचा-यांच्या वेतनप्रश्नी पुकारण्यात आलेला संप 16 तासांनंतर मागे घेण्यात आला आहे. आज दुपारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि बेस्ट कर्मचारी कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्दे16 तासांनंतर संप मागेमातोश्रीवरील बैठक यशस्वीसणासुदीत प्रवाशांना फटका

मुंबई, दि.7 - मुंबईतील बेस्ट  कर्मचा-यांच्या वेतनप्रश्नी पुकारण्यात आलेला संप 16 तासांनंतर मागे घेण्यात आला आहे. आज दुपारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि बेस्ट कर्मचारी कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 'बेस्ट' कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर द्यावा आणि तोट्यात असलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्यांसहीत बेस्ट कर्मचा-यांनी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला होता. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराची आम्हालाही चिंता आहे. त्यांनी त्वरित कामावर रुजू व्हावे. सर्व कर्मचा-यांचे पगार होण्याची आम्ही शाश्वती देतो. कर्मचाऱ्यांचे पगार 10 तारखेला होणार असून यापुढे बेस्टची सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारतो. तसेच, या संपामुळे मुंबईकरांचे जे झाले आहेत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.  तर, बेस्ट कर्मचारी कृती समितीचे नेते शशांक राव यांनी  बेस्ट कर्मचा-यांचा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करत सर्व कर्मचा-यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन केले आहे.  दरम्यान, बेस्ट कामगारांच्या वेतनप्रश्नी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीमध्ये महापौर निवास येथे रविवारी ( 6 ऑगस्ट ) झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यामुळे बेस्टचे सुमारे 36 हजार कामगार रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले. महत्त्वाचे म्हणजे वेतनप्रश्नी महापालिका आयुक्त अजय मेहता जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत; तोपर्यंत बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले होते. तर संपकऱ्यांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला होता.

सणासुदीत प्रवाशांना फटका...सोमवारी ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशी हा संप पुकारल्याने मुंबईकरांना याचा फटका  बसला.