मुंबई : आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाने मदतीसाठी पुन्हा एकदा महापालिकेला साकडे घातले आहे. पुन्हा एक हजार कोटी रुपये मदत मिळावी, तसेच या आधी घेतलेल्या कर्जाचे व्याज माफ करावे, अशी मागणी बेस्टकडून पुढे आली आहे. महापालिकेतही याबाबत सकारात्मक विचार सुरू असून, बेस्ट उपक्रमाचे भवितव्य सोमवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत ठरणार आहे.आर्थिक संकटात असलेले बेस्ट उपक्रम फेब्रुवारी महिन्याचे वेतनही आपल्या कामगारांना देऊ शकत नव्हती. अखेर कामगारांनी संपाचे हत्यार उपसल्यानंतर, टाटा वीज कंपनीचे देय थकवून कामगारांचे वेतन देण्यात आले. मात्र, आजचे मरण उद्यावर टळले, तरी पुढच्या महिन्यात पुन्हा हीच समस्या असणार आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून बेस्टला बाहेर काढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा गटनेत्यांच्या बैठकीपुढे मांडण्यात येणार असल्याचे समजते.यामध्ये बेस्ट उपक्रमाला एक हजार कोटी रुपये बिनव्याजी देण्यात यावेत, तसेच २०१३ मध्ये देण्यात आलेल्या १६०० कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची विनंती करण्यात आली आहे. महापालिका पालक संस्था असल्याने, या सार्वजनिक उपक्रमाला वाचवू शकते. त्यामुळेच त्यांच्याकडे मदतीची याचना बेस्ट उपक्रम करत आहे. मात्र, याबाबत महापालिका काय निर्णय घेते, हे सोमवारच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज ३० लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, सार्वजनिक उपक्रम असल्याने, ना नफा ना तोटा तत्त्वावर बसगाड्या चालविण्यात येत आहेत.एखाद दुसरा अपवाद वगळता, बेस्टचे पाचशे बसमार्ग तोट्यात आहेत. विद्युत पुरवठा विभागातील नफ्यातून तूर्तास बेस्टचा आर्थिक कारभार सुरू आहे.एसी बस बंद कराबेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात अडीचशे वातानुकूलित बसगाड्या आहेत. मात्र, या बसगाड्या तोट्यात असल्याने, त्या बंद करण्याची मागणी होत आहे. अखेर ही सेवा बंद करून, बेस्ट उपक्रमाचे वार्षिक ८२ कोटी रुपये वाचविण्याचा विचार सुरू आहे.
आर्थिक मदतीसाठी महापालिकेला बेस्टचे साकडे
By admin | Published: March 26, 2017 5:47 AM