मुंबई : ट्रान्स हार्बर लिंक रोड म्हणजेच अटल सेतू २१ जानेवारीपासून प्रवासी सेवेत आला. दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या अटल सेतू मार्गे सार्वजनिक वाहतूक सुरू झाल्यानंतर या मार्गावरून बेस्ट उपक्रमातर्फे प्रवासी बस वाहतूक गुरुवारपासून सुरू होत आहे. जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) आणि कोकण भवन, सीबीडी बेलापूरदरम्यान या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
२१.८ किलोमीटर लांब अटल सेतू, १६.५ किमी मार्ग समुद्रावर आहे. अटल सेतूवरून सामान्यांना परवडेल अशी बससेवा या मार्गावर सुरू केली जावी, अशी मागणी सुरू होती. अखेर बेस्ट उपक्रमाने याची दखल घेत बसमार्ग क्र. एस - १४५ ही सेवा सुरू केली. सकाळी सीबीडी बेलापूर येथून आणि संध्याकाळी जागतिक व्यापार केंद्र येथून बसफेऱ्या सुरू होतील. याआधी प्रायोगिक तत्त्वावर या मार्गाची चाचपणीही केली. प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
असा असेल मार्ग -
जागतिक व्यापार केंद्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र (मंत्रालय), डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ), पूर्व मुक्त मार्ग अटल सेतू (उड्डाणपूल) उलवे नोड - किल्ले गावठाण बामणडोंगरी रेल्वे स्थानक कोकण भवन सीबीडी बेलापूर.
१) बसचा कालावधी - सोमवार ते शनिवार
२) भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूमुळे मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कनेक्टिव्हिटी
३) आतापर्यंत १० लाखांहून अधिक वाहने धावली
४) फास्ट टॅगद्वारे १३ कोटींहून अधिक तर रोख रकमेद्वारे ८७ लाखांहून अधिक टोल वसूल