बेस्ट प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर; सीएनजी बसमध्ये वायुगळती तपासण्याची यंत्रणा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 02:27 AM2019-05-31T02:27:04+5:302019-05-31T06:13:28+5:30
बेस्टच्या बसगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे प्रवाशांसाठी ही बाब धोकादायक ठरणारी आहे.
मुंबई : वायुगळतीमुळेच बेस्ट उपक्रमातील सीएनजी बसगाडीने गोरेगाव येथे पेट घेतल्याचे अंतिम अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र ताफ्यातील सीएनजी बसगाड्यांमधील वायुगळतीबाबत चेतावणी देणारी कोणतीच यंत्रणा बेस्ट उपक्रमाकडे नाही. त्यामुळे या बसगाड्यांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.
गोरेगाव पूर्व येथे चालत्या सीएनजी बसगाडीने ३ मे रोजी पेट घेतला होता. सुदैवाने या दुर्घटनेत प्रवासी व वाहक, चालक बचावले. या दुर्घटनेच्या चौकशीत सीएनजी गॅसगळती झाल्यास त्याचे संकेत देणारी व्यवस्था बसमध्ये नसल्याचे समोर आले. बेस्टच्या बसगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे प्रवाशांसाठी ही बाब धोकादायक ठरणारी आहे.
२००९ मध्ये बेस्ट उपक्रमाने ही दुर्घटनाग्रस्त बस खरेदी केली होती. बसमधील सीएनजी सिलिंडरचे तपासणी प्रमाणपत्र २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत वैध असल्याने बस चांगल्या स्थितीत होती, असा बचाव प्रशासनाने बेस्ट समितीच्या बैठकीत केला. अशा १९०० बसपैकी ८२८ बसमधील प्रेशर गेजचे पाच लाख कि.मी. आयुर्मान पूर्ण झाल्यास ते बदलले जातील. गॅसगळती शोधणाºया यंत्राच्या साहाय्याने सर्व बसची पाहणी होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांची कमतरता
- बससाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या खरेदीसाठी लागणारा दरमहा १३ कोटी रुपयांचा खर्च बेस्टला परवडणारा नाही.
- सध्याच्या स्थितीत बससाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा तुटवडा आहे.
- आवश्यक कर्मचारी वर्गाची कमतरता आहे.