मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने गेल्या दहा वर्षांत १३४ कोटींचा मालमत्ता कर थकविला आहे. गेल्या वर्षभरात कोविडमुळे बेस्टच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या करातून सूट मिळण्यासाठी बेस्ट प्रशासन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची लवकरच भेट घेणार आहे.
बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पालक संस्था असलेल्या महापालिकेने कृती आराखडाही तयार केला होता. तसेच अनुदान व कर्जा स्वरूपात दोन हजार कोटी रुपयेही दिले आहेत. मात्र मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाला मोठा फटका बसला. त्यामुळे आर्थिक तूट आणखी वाढली आहे.
बेस्टवर गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाचे ओझे आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत बेस्ट उपक्रमाने मालमत्ता कराचे १३४ कोटी रुपये थकवले असल्याचे समोर आले आहे. याबाबत बेस्ट समिती सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या करामध्ये महापालिकेकडून सूट मिळावी विवाहकर माफ करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सदस्यांनी प्रशासनाकडे केली. त्यानुसार बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र हे आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे समजते.