टाटाला टक्कर देण्यास बेस्टच्या वीज दरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:02 AM2018-10-09T06:02:56+5:302018-10-09T06:03:06+5:30
विद्युत पुरवठा विभागातील नफ्यामुळे बेस्ट उपक्रमाची बस गाडी रस्त्यावर टिकून आहे. मात्र आतापर्यंत शहर विभागात असलेली बेस्ट उपक्रमाची मक्तेदारी मोडीत निघून टाटा कंपनीला वीजपुरवठा करण्याची मुभा मिळाली आहे.
मुंबई : विद्युत पुरवठा विभागातील नफ्यामुळे बेस्ट उपक्रमाची बस गाडी रस्त्यावर टिकून आहे. मात्र आतापर्यंत शहर विभागात असलेली बेस्ट उपक्रमाची मक्तेदारी मोडीत निघून टाटा कंपनीला वीजपुरवठा करण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बेस्ट उपक्रमाने वीज दर कमी केले आहेत. याचा फायदा व्यावसायिक ग्राहकांना अधिक होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मंजुरी दिल्यानंतर बेस्ट उपक्रमाने नवीन वीज दर पत्रक बेस्ट समितीपुढे सोमवारी सादर केले.
बेस्ट उपक्रमामार्फत शहर विभागात १० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. टाटा कंपनीकडून वीज खरेदी करून बेस्ट उपक्रम आपल्या ग्राहकांना वीजपुरवठा करीत आहे. मात्र ही मक्तेदारी मोडीत निघून टाटा कंपनीसाठी शहरातील द्वार खुले झाले आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला धोका निर्माण झाला आहे. नफ्यात असलेल्या वीजपुरवठा विभागाचा कारभार सुरळीत राहण्यासाठी विजेचे दर कमी ठेवणे बेस्ट उपक्रमाला भाग आहे.
त्यानुसार २०१८-१९ मध्ये सरासरी वीजदरात ७.६ टक्के तर २०१९-२०२० मध्ये १२.३१ टक्के दर कमी करण्यात येणार आहेत. यामध्ये निवासी ग्राहकांपेक्षा मोठ्या वीज ग्राहकांना खूश करण्यात आले आहे. या ग्राहकांकडून मिळणारा महसूल अधिक असल्याने त्यांना सूट दिल्यास हे ग्राहक टाटा कंपनीकडे वळणार नाहीत, असा विश्वास बेस्ट प्रशासनाला वाटत आहे. ही कपात १ एप्रिल २०१९ पासून लागू होणार आहे.
(आकडेवारी प्रति किलो वॅट)
प्रकार २०१८-१९ २०१९-२०
औद्योगिक ७.५८ ६.२९
व्यावसायिक ७.८८ ६.४८
मोनो, मेट्रो, रेल्वे ६.१८ ५.०२
रुग्णालय, शैक्षणिक संस्था ७.२६ ५.७०
निवासी (दारिद्र्यरेषेखाली) १.२२ १.०२
०-१०० युनिट १.६७ १.६५
१०१-३०० ३.९२ ३.९०
३०१-५०० ६.७२ ६.७०