पुन्हा वेगाने धावण्यासाठी बेस्ट सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:16 AM2020-06-06T06:16:39+5:302020-06-06T06:16:48+5:30
चर्चा, बैठकांवर जोर : परमिटधारक घेऊ शकतात सेवेचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाला हरविताना लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू का होईना अनलॉक केले जात आहे. मुंबईतदेखील बहुतांशी सेवा सुरू होत असतानाच मुंबईची ओळख असलेली बेस्ट पुन्हा धावण्यासाठी सज्ज आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी सोमवारपासून ती धावणार का, याबाबत अद्याप बेस्ट प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. मात्र ‘मिशन बीगिन अगेन’मध्ये ज्यांना परमिट दिले आहे; असे प्रवासी बेस्टची सेवेचा वापर करू शकतील, असे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बेस्टच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन विभाग १०० टक्के सुरू आहे. विद्युत विभागात ३५ विभाग आहेत. यात ५ विभाग १०० टक्के सुरू आहेत. उर्वरित ३० टक्के विभाग ५ टक्के सुरू आहे. आॅपरेशन आणि वर्क हे शंभर टक्के सुरू आहे. परिवहनचा विचार करता येथे ४० टक्क्यांपेक्षा कमी लोक कामावर येत नाहीत. त्यांना नोटीस दिल्या आहेत.
बेस्ट कामगारांच्या सुरक्षेचा विचार करता कामगारांना सॅनिटायझर देण्यात येते, मास्क, डिस्पोझल मास्क, लिक्विड सोप दिला जात आहे. कंटेनमेंट झोनमध्ये जे कामगार काम करण्यास जातात त्यांना किट आणि शिल्ड दिले जात आहे. विम्याबाबत प्रशासन विचार करते आहे. चर्चा सुरू आहे. सोमवारपासून किती कामगार कामावर येणार? किती गाड्या धावणार? याबाबत अद्याप जाहीर माहिती दिली जात नसली तरी सर्वांना कामावर बोलाविण्यात आले आहे. सेवा पूवर्वव करण्यसाठी बेस्ट प्रशासन प्रयत्नशील आहे.
काही कामगार गावी गेले आहेत. जे येत नाहीत त्यांना नोटीस दिली जात आहे. कदाचित सोमवारी कामगार मोठ्या संख्येने कामावर येतील, असे चित्र आहे. दरम्यान, मुंबई पूर्वपदावर येत आहे. अनेक ठिकाणी दुकाने सुरू झाली आहेत. सोमवारपासून मुंबई बऱ्यापैकी रस्त्यावर उतरेल. मात्र त्यांच्यासाठी बस सेवा कितपत उपलब्ध होईल, हे मात्र सोमवारीच समजण्याची शक्यता आहे.
महाव्यवस्थापकांसोबत सोमवारी बैठक
बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांंच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, फिझिकल डिस्टन्सिंगबाबतची बैठक व्यवस्था बेस्टमध्ये सध्या तरी नाही. आम्ही सोमवारी बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत चर्चा करू. त्यांच्याशी संवाद साधू. बेस्टसोबत झालेल्या बैठका, चर्चा यानंतर महापालिकेसोबतही संवाद साधला जाईल.
सोमवारी आपण यावर काही तरी विचारविनिमय करणार आहोत. अजून बैठक लावण्यात आलेली नाही. बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबतही संवाद साधला जाईल. ८ जूनपासून बेस्ट बस सर्वसामान्यांसाठी खुली होईल का? याबाबत अद्याप काही सांगता येत नाही. फक्त याविषयी चर्चा करीत आहोत. निर्णय झाल्याशिवाय मीदेखील याबाबत स्पष्ट काही सांगू शकत नाही.