कर्ज काढूनच बेस्ट कामगारांचा पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:52 AM2017-08-12T06:52:22+5:302017-08-12T06:52:27+5:30
गेल्या तीन-चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या महिन्यात १० तारखेला कामगारांच्या बँक खात्यात पगार जमा झाला आहे. पालिका प्रशासनाने जबाबदारी उचलल्यानंतर, बेस्ट कामगारांनी संप मागे घेतला होता.
मुंबई : गेल्या तीन-चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या महिन्यात १० तारखेला कामगारांच्या बँक खात्यात पगार जमा झाला आहे. पालिका प्रशासनाने जबाबदारी उचलल्यानंतर, बेस्ट कामगारांनी संप मागे घेतला होता. मात्र, कामगारांना दिलासा मिळाला, तरी यासाठी बेस्ट प्रशासनाला पुन्हा २५० कोटींचे कर्ज काढावे लागले आहे.
बेस्ट उपक्रम आर्थिक डबघाईला आल्यामुळे, कामगारांचे पगार कर्ज काढून देण्यात येत आहेत. मात्र, सतत कर्ज काढून पालिकेची पतही कमी झाल्यामुळे कर्ज मिळणेही कठीण होऊन बसले होते. याचा फटका कामगारांना बसून, फेब्रुवारी महिन्यापासून २०-२२ तारखेनंतर पगार मिळू लागला होता. यामुळे हवालदिल झालेल्या कामगारांनी पालिकेकडून मदत मिळण्यासाठी उपोषण केले. या आंदोलनाची दखल पालक संस्था असलेल्या पालिकेनेही न घेतल्याने, कामगारांनी ६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला. अखेर बेस्ट कर्मचारी आणि त्यांच्या पगाराची जबाबदारी उचलण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर, संप मागे घेण्यात आला होता.
त्यानुसार, बेस्ट कामगारांना गेल्या महिन्याचा म्हणजे, जुलैचा पगार १० तारखेला मिळाला आहे. बँकेच्या खात्यात पगार जमा झाल्याचा संदेश मोबाइलवर येताच कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मात्र, डोक्यावर दोन हजार कोटी रुपये कर्ज असलेल्या बेस्टला, पगारासाठी पुन्हा अडीचशे कोटींचे कर्ज एका राष्ट्रीयीकृत बँकेतून काढावे लागले आहे. यापैकी १२० कोटी रुपये विजेपोटी टाटा कंपनीला द्यावे लागले आहेत.
उर्वरित १३० कोटी रक्कम आणि उत्पन्नातील ५० कोटी रुपये, असे १८० कोटी रकमेतून कामगारांचे पगार देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले, तर बेस्टने पगारासाठी मदतीची मागणीच केली नव्हती, असे स्पष्टीकरण एका पालिका अधिकाºयाने दिले आहे.