चिल्लरच्या रूपात मिळतोय ‘बेस्ट’ पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 04:14 AM2018-12-23T04:14:26+5:302018-12-23T04:14:44+5:30
सुट्ट्या पैशांवरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये नेहमीच खटके उडत असतात. मात्र हेच सुट्टे पैसे पगार स्वरूपात बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळू लागले आहेत.
मुंबई : सुट्ट्या पैशांवरून कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये नेहमीच खटके उडत असतात. मात्र हेच सुट्टे पैसे पगार स्वरूपात बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळू लागले आहेत. आर्थिक अडचणीत असलेला बेस्ट उपक्रम कामगारांचा पगार दररोज बस भाड्याच्या माध्यमातून मिळणाºया चिल्लरद्वारे भागवित आहे.
बेस्ट उपक्रम तुटीत असल्याने कामगारांचा दर महिन्याचा पगार देण्यातही अडचण येत आहे. पैशांची तजवीज झाल्यानंतरच कामगारांना पगार देण्यात येत होता. त्यामुळे कामगारांचा पगार दर महिन्याच्या २० तारखेनंतर होऊ लागला. परिणामी, कामगारांमध्ये रोष पसरून आंदोलनाचा इशाराही कामगारांनी अनेकवेळा दिला. अखेर प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पगार देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
हा पगार नाण्यांच्या स्वरूपात मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये सुमारे ३९ हजार कर्मचारी आणि अधिकाºयांना पगाराचा भाग म्हणून प्रत्येकी १० रुपयांची ४० नाणी देण्यात आली. अशा प्रकारे पगाराचा हिस्सा म्हणून एक कोटी चार लाख रुपयांचे वाटप नाण्यांच्या स्वरूपात झाले. त्यामुळे प्रत्येक महिन्याला चिल्लर मोजण्याची वेळ बेस्टच्या कामगारांवर आली आहे.
यासाठी दिली जातात नाणी
बेस्ट उपक्रमात परिवहन सेवेतून जमा होणाºया सुट्ट्या पैशांचा विनियोग वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात रक्कम शिल्लक राहते. काही बँकांमध्ये चिल्लर स्वीकारली जात नाही. त्यामागेही सुट्टे पैसे मोजणार कोण, ताळमेळ आदी अनेक समस्या असतात. यावर उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने सुट्टे पैसे कर्मचाºयांना देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
बेस्टच्या ताफ्यात - ३,३३७ बसगाड्या
दरमहा - ७० लाख रुपये मूल्यांची १० रुपयांची नाणी जमा होतात. दहा हजार कंडक्टरांना दररोज प्रत्येकी १०० रुपयांची नाणी दिली जातात. त्यामध्ये १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० रुपयांच्या नाण्यांचा समावेश असतो.