मुंबई : पालक संस्था असलेल्या महापालिकेने बेस्ट उपक्रमाचा भार उचलण्याची अखेर तयारी दाखवली आहे. त्यानुसार, बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते व प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या सुविधा बंद करण्यात येणार आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन आॅनटाइम मिळेल, याची हमी गटनेत्यांच्या बैठकीत आयुक्तांनी शनिवारी दिली आहे.बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी तयार केलेला कृती आरखडा बेस्टने पालिका गटनेत्यांच्या बैठकीत शनिवारी सादर केला. यावर चर्चेदरम्यान बेस्टमधून यापुढे फक्त पालिका शाळांमधील मुले व स्वातंत्र्य सैनिकांनाच मोफत प्रवास दिला जाईल. इतर मोफत प्रवासाच्या सवलती तूर्तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.पांढरा हत्ती ठरलेल्या वातानुकूलित बसगाड्या बंद करण्यास सांगण्यात आले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, बक्षीस, वैद्यकीय भत्ता व इतर भत्ते दिले जातात. यास स्थगिती देण्यास आली आहे. बेस्टमार्फत प्रवाशांच्या सवलती व कर्मचाऱ्यांचे भत्ते आर्थिक तोट्यातून बाहेर आल्यावर सुरू करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
मार्च महिन्याचा ‘बेस्ट’ पगार पालिका देणार
By admin | Published: April 02, 2017 12:12 AM