बेस्ट म्हणते, चार्जिंगसाठी अजून थांबा, ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम संथ गतीने

By रतींद्र नाईक | Published: June 1, 2023 01:47 PM2023-06-01T13:47:59+5:302023-06-01T13:48:17+5:30

काही ठिकाणी तर कामाचा पत्ताच नाही...

BEST says, wait for 330 charging stations, Some places do not even have a work going | बेस्ट म्हणते, चार्जिंगसाठी अजून थांबा, ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम संथ गतीने

बेस्ट म्हणते, चार्जिंगसाठी अजून थांबा, ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम संथ गतीने

googlenewsNext

मुंबई :  पर्यावरण पूरक आणि किफायतशीर सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांच्या वाहनांच्या चार्जिंगची गरज भागावी म्हणून ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला. मात्र बेस्ट आगारात व आगाराबाहेर हे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम संथ गतीने 
सुरू आहे. 
६० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी अद्याप या कामाला सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे बेस्ट आगारात मुंबईकरांना वाहन चार्जिंग करण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार. विजेवरील वाहनांना मागणी वाढली आहे.
दक्षिण मुंबईत बेस्टद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात अदानी कंपनीद्वारे वीज वितरित केली जाते. त्यामुळे उपनगरातील आगारात चार्जिंग स्टेशन्ससाठी बेस्ट अदानीची वीज वापरणार आहे.

७,००० इलेक्ट्रिक बस

वाहनांमुळे होणारे वाढते प्रदूषण पाहता बेस्टने पर्यावरणपूरक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विजेवर चालणाऱ्या या बस प्रवाशांच्या पसंतीस पडत असून किफायतशीर तिकीट दरामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बेस्टच्या ताफ्यात लवकरच २१०० एसी बस येणार असून २०२३ अखेर पर्यंत एसी बसची संख्या ७ हजार इतकी होणार आहे.

१,१०० हून अधिक इलेक्ट्रिक गाड्या

बेस्टने प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या आहेत. या बस धावताना अजिबात आवाज येत नाही. बेस्टच्या ताफ्यात अकराशेहून अधिक इलेक्ट्रिक बस असून, ही संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. या बस चार्ज करण्यासाठी मुंबईतील बॅक बे, वरळी, शिवाजी नगर, धारावी आणि मालवणी अशा  २० ठिकाणी चार्जिंगची सुविधा आहे.

मुंबईकरांची इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगची चिंता मिटविण्यासाठी बेस्टने पुढाकार घेतला असून इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी संपल्यावर वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी ‘बेस्ट’ने आगारात तसेच आगाराबाहेर चार्जिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहन चालकांना या ठिकाणी आपली वाहने माफक दरात चार्ज करता येणार आहेत. इतकेच नव्हे तर मुंबईकरांना घरबसल्या मोबाइलवर चार्जिंगसाठी स्लॉट बुक करता येतील.

३३० चार्जिंग स्टेशन
बेस्ट उपक्रमाचे २७ आगार मुंबईत आहेत. या आगारांमध्ये ६० ठिकाणी ३३० चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

१५ रुपये प्रती युनिट
मुंबईकरांनी बेस्टच्या आगारात आपल्या गाड्या चार्जिंगसाठी पार्क केल्यानंतर १५ किंवा १६ रुपये प्रति युनिट दराने विजेचे त्यांच्याकडून पैसे आकारले जाणार आहेत. 

मुंबईतील विविध आगारात चार्जिंग पोर्ट बसविण्यात येणार असून, या ठिकाणी ६ ते ८ गाड्या मुंबईकरांना चार्जिंगसाठी पार्क करता येणार आहे. हे काम जूनच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. 
लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

Web Title: BEST says, wait for 330 charging stations, Some places do not even have a work going

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.