उभ्याने प्रवासास मनाई; अनेक स्टॉपवर बस थांबल्याच नाहीत, गर्दीच्या वेळी हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर सोमवारपासून बेस्ट पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु सीट फुल झाल्यानंतर प्रवेश दिला जात नसल्याने पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. उभ्याने प्रवासास परवानगी नसल्याने गर्दीच्या वेळी सर्व बसस्थानकांवर लांबलचक रांगा हाेत्या.
निर्बंध शिथिलीकरणानंतर बहुतांश व्यवहार सुरू झाल्याने शनिवारपासून मुंबईतील गर्दी वाढली. अद्याप सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने बेस्ट बसवरील ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सोमवारपासून बेस्ट पूर्ण क्षमतनेच चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उभ्याने प्रवास करण्याची परवानगी नसल्याने सोमवारी प्रवाशांना बस पकडण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. आसन क्षमता पूर्ण झाली की बस मार्गस्थ होत आणि उर्वरित प्रवासी पुढच्या बसची वाट पाहत तासनतास ताटकळत उभे राहत, असे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.
पहिल्या स्टॉपवरच सीट पूर्ण भरत असल्याने अन्य थांब्यांवरच्या प्रवाशांना न घेताच अनेक बस रवाना झाल्याचे सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत अनेक थांब्यांवर पाहायला मिळाले. त्यामुळे एरवी शुकशुकाट असलेल्या बसस्टॉपवरही सोमवारी मोठी गर्दी दिसून आली. याचा सर्वाधिक फटका कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला. एकही बस उभी राहत नसल्याने बऱ्याच जणांना रिक्षा-टॅक्सी किंवा ओला-उबर करून कार्यालय गाठावे लागले.
* ऑफिसला लागला लेटमार्क
मी सकाळी ८.३० वाजता बससाठी रांग लावली. पाच बस गेल्यानंतर माझा नंबर लागला. यात दीड तास वाया गेल्याने ऑफिसला लेटमार्क लागला. बेस्टमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून किमान १० ते १५ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. प्रशासनाने त्याला परवानगी देण्यास काहीच हरकत नाही.
- ज्योती कदम, मुलुंड
* वर्दळीच्या मार्गावर लागोपाठ बस
घाटकोपर स्थानकाबाहेरून वर्दळीच्या मार्गावर लागोपाठ बस सोडण्यात येतात. सीट भरल्या नसल्या तरी बस सोडल्या जातात. त्या तुलनेत इतर मार्गांवरील फेऱ्या मर्यादित करण्यात आल्या आहेत. एक-दीड तास बस येत नसल्यामुळे लांबलचक रांगा लागत आहेत. फेऱ्यांचे नियोजन करणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
- सुनील गोठोस्कर, घाटकोपर
* बस आधीच भरून येते, आम्ही कुठे बसायचे?
साकीनाक्याहून थेट बस सुटत नाही. ज्या बस येथे येतात त्या आधीच भरलेल्या असतात. त्यात उभ्याने प्रवास करू दिला जात नसल्याने रिकाम्या बसची वाट पाहत तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. बस लवकर येत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
- केदार पवार, साकीनाका
* मास्क नाही, तर प्रवेश नाही
रुग्णसंख्या कमी झाल्यापासून बरेच जण बेफिकीरपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत. बेस्टने अशा प्रवाशांना बसमध्ये प्रवेश न देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना सोमवारी खाली उतरविण्यात आले. तसेच गाडी सुरू झाल्यानंतर मास्क हनुवटीखाली ओढल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रवाशांना वाहकांनी नियमांचे पालन करण्यास सांगत असल्याचे दिसून आले.
..........................................