मुंबई : आरोग्यविषयक जनजागृतीत बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून ‘टीबी हारेगा-देश जितेगा’ या क्षयरोगविषयक प्रचार मोहिमेतही अधिकाधिक बसगाड्या आणि बसथांबांमार्फत प्रसिद्धी करून मुंबईकरांपर्यंत संदेश पोहोचविला जाईल, अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी दिली.‘टीबी हारेगा-देश जितेगा’ उपक्रमाचे संदेशदूत प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची छबी आणि मोहिमेचे निरनिराळे संदेश असलेले फलक, पोस्टर्स बेस्टच्या बसवर लावण्यात आले असून या माध्यमातून मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. २० बस आणि ४० थांबे यांच्यामार्फत १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत ही प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. रुग्णालयांच्या परिसरात बसथांबे आहेत तेथे अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.दरवर्षी भारतात नवीन १२ लाख, महाराष्ट्रात सव्वा लाख तर मुंबईत ३० हजार क्षयरोगाचे रुग्ण आढळतात. मुंबई महानगरात संसर्गजन्य क्षयरोग क्षयरोगाचा धोका आहे. हे लक्षात घेऊन जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
क्षयरोग जनजागृतीसाठी ‘बेस्ट’ पाऊल
By admin | Published: October 02, 2015 1:26 AM