BEST Strike : मुंबईकरांच्या मदतीला एसटी आली धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 11:37 AM2019-01-08T11:37:04+5:302019-01-08T11:58:04+5:30
BEST Strike : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी वेठीस धरत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून बेस्ट कामगारांनी संप पुकारला आहे.
मुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी वेठीस धरत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून बेस्ट कामगारांनी संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, बेस्टच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी मुंबईकरांच्या मदतीला धावून आली आहे. सध्या एकूण 40 एसटी बसेस प्रवाशांसाठी रस्त्यावर धावत आहेत. शिवाय, गरजेनुसार जादा एसटी बसेस सोडण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.
कुर्ला पश्चिम ते बांद्रा - 05 एसटी
कुर्ला पूर्व ते चेंबूर - 05 एसटी
दादर ते मंत्रालय - 05 एसटी
पनवेल ते मंत्रालय - 05 एसटी
सीएसएमटी ते मंत्रालय - 05 एसटी
ठाणे ते मंत्रालय - 15 एसटी
(Live : बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार, सर्वसामान्य वेठीस)
संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा दिला, तसेच औद्योगिक न्यायालयातून संप बेकायदेशीर ठरवून कामगारांनाच आव्हान दिले. यामुळे संतप्त कामगार सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल होत आहेत.
#Mumbai: 40 extra buses being run by state transport department in the view of an indefinite strike by BEST(Brihanmumbai Electricity Supply&Transport) over demands of implementation of the merger of the BEST budget with principal budget of the BMC, employee service residences etc
— ANI (@ANI) January 8, 2019
(BEST Strike : मुंबईकरांचे प्रचंड हाल; मेट्रोमध्ये तुफान गर्दी तर रिक्षावाल्यांकडून होतेय लूट)
बेस्ट चालक-वाहक संपामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले असल्यानं पश्चिम उपनगरातील बस सेवाच ठप्प झाली आहे. त्यामुळे स्टेशनपासून दूरवर राहणाऱ्या आणि रोज बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे, शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तर दुसरीकडे, बेस्टच्या संपाचा फायदा घेत टॅक्सी-रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांकडून अव्वाच्या-सव्वा भाडे उकळले जात आहे. शेअर रिक्षाचालकांकडून आज 30 रुपये भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. दरम्यान, बेस्ट संपामुळे आज अनेक विद्यार्थी शाळा तसंच कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत.
काय आहेत मागण्या?
- सुधारित वेतन करार
- दिवाळीचा बोनस
- कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडविणे
- बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण
कारवाई होणार
संपात सहभागी होणाऱ्या कर्मचा-यांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिला आहे. आश्वासनावरच बोळवण गेले अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. मात्र, कामगारांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. दरवर्षी आश्वासनावरच बोळवण होत आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप टळणार नाही, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.
#Mumbai: BEST (Brihanmumbai Electricity Supply and Transport) have begun an indefinite strike from Monday midnight, over the demands of implementation of the merger of the BEST budget with principal budget of the BMC, employee service residences and recruitment among others.. pic.twitter.com/DgPprAHGkM
— ANI (@ANI) January 8, 2019
शिवसेनेचा नैतिक पाठिंबा
सत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, कामगारांचा कौल संपाच्या बाजूने असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे या संपाला शिवसेना नेत्यांनी नैतिक पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या वर्षी कामगारांनी पुकारलेला संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कामगारांनी मागे घेतला होता. त्यामुळे पुन्हा संप होऊ नये, यासाठी शिवसेना नेत्यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, बेस्ट प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी जादा गाड्या सोडण्यासाठी एस.टी. महामंडळाला पत्र पाठविले असल्याचे बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, ९५ टक्के कामगार संपाच्या बाजूने असल्यामुळे बससेवेवर परिणाम होणार आहे.
Mumbai: Bus services affected at the CSMT due to the indefinite strike by BEST(Brihanmumbai Electricity Supply&Transport) over demands of implementation of the merger of the BEST budget with principal budget of the BMC, employee service residences etc. pic.twitter.com/SXlTfiZDeB
— ANI (@ANI) January 8, 2019