मुंबईः आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज नवव्या दिवशी 'सुफळ संपूर्ण' झाला. बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू होणारी १० टप्प्यांची वेतनवाढ तातडीने लागू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. तसंच अन्य मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक केली. त्यामुळे कामगार एकजुटीचा विजय झाला आणि वडाळा बेस्ट डेपोचा परिसर दणाणून गेला. आठ दिवसांनंतर डेपोमधून पहिली बस बाहेर पडली, तेव्हा हजारो कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता. विशेष म्हणजे, संप मागे घेतल्याची घोषणा करताना कामगार नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे विशेष आभार मानले आणि कर्मचारी राजाला साथ द्या, या मनसेच्या गाण्यावर थिरकलेसुद्धा.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी व्हावा, त्यांना न्याय मिळावा, म्हणून मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे कामगार नेत्यांनी आभार मानले. त्यात कपिल पाटील, आशीष शेलार, नारायण राणे, मुंबई पोलीस, प्रसारमाध्यमं, मुंबई उच्च न्यायालय यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्रवासीयांचं मराठी मन जाणणाऱ्या, मराठी माणसासाठी धडपडणाऱ्या राज ठाकरेंनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार, असं नेत्यांनी म्हटलं तेव्हा टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या. याउलट, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेनेच्या कामगार नेत्यांवर शशांक राव यांनी निशाणा साधला. त्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'तुमच्या राजाला साथ द्या' हे गाणं वडाळा डेपोत वाजलं आणि कामगार आनंदात नाचले.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी न्यायालयानं मध्यस्थाची नियुक्ती केली आहे. अंतिम तडजोडीसाठी प्रशासनाला 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू होणारी 10 टप्प्यांची वेतनवाढ तातडीनं लागू करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. यासोबतच एकाही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करणार नाही, कोणाचंही वेतन कापलं जाणार नाही, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.