BEST Strike : मनसेचा बेस्टच्या संपाला पाठिंबा, संपकरी कर्मचारी राज ठाकरेंची भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 09:55 AM2019-01-10T09:55:25+5:302019-01-10T10:31:54+5:30
BEST Strike : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या लढाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी अखेरपर्यंत उभी आहे, अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता कृष्णकुंजवर संपकरी बेस्ट कर्मचारी राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान, कामगार आपल्या समस्या-मागण्या राज ठाकरेंसमोर मांडणार असल्याची माहिती आहे.
एकीकडे राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केलेला असताना, दुसरीकडे शिवसेनेनं संपाला दिलेला नैतिक पाठिंबा मंगळवारी (8 जानेवारी) काढून घेतला. शिवसेनेने संपातून माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या संघटनेतील काही पदाधिका-यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. स्वपक्षीय संघटनेतच फूट पडल्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा. ✊
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 9, 2019
उद्या दि. १० जानेवारी २०१९ रोजी, सकाळी ११.०० वा. सर्व बेस्ट कर्मचारी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना भेटण्याकरिता कृष्णकुंज येथे जाणार आहेत. #कामगारांचीमनसेpic.twitter.com/SCvzFNqzPt
संपाला दिलेला पाठिंबा शिवसेनेनं काढून घेतला असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट संपाच्या वादात उडी घेतली आहे. बेस्टच्या तिढ्याप्रश्नी उद्धव ठाकरे आता स्वत: मध्यस्थी करणार आहेत. आज दुपारी महापौर, बेस्ट समिती अध्यक्ष आणि आयुक्तांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काय तोडगा काढण्यात येणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेस्ट संपाचा तिसरा दिवस
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. बेस्ट प्रशासनाने मेस्मांतर्गत कारवाई तसेच कामगार वसाहती खाली करण्यास सुरुवात केली आहे. कामगार संघटना ठाम राहिल्यामुळे संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. परिणामी, मुंबईकरांचे सलग तिसऱ्या दिवशीही हाल सुरू आहेत. कारवाईमुळे बेस्ट कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहे. बेस्ट उपक्रम ही अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाने औद्योगिक न्यायालयातून संपावर बंदी आणून हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे तीनशे कामगारांवर मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस तसेच भोईवाडा, परळ, वडाळा, कैलास पर्वत येथील बेस्ट वसाहतीतील दोन हजार कामगारांकडून घरे खाली करून घेण्यास सुरुवात झाली. या कारवाईला कामगारांनी विरोध केल्याने संप चिघळला आहे.
वेतन करार, बोनस, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्द्यांवर बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे.
या मागण्यांसाठी संप
1. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे
2.एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी
3. अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती
4. बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल
5. कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे
वडाळा आगारावर मोर्चा धडकणार
बेस्ट कर्मचा-यांनी पुकारलेला संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने बेस्ट वसाहतींमध्ये राहणा-या कर्मचा-यांना घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाची ही कारवाई चुकीची असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत कर्मचा-यांच्या पत्नी एकवटल्या आहेत.
बेस्ट वडाळा आगारावर गुरुवारी सकाळी 11 वाजता कर्मचा-यांच्या पत्नी धडक मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने दिली आहे.
Central Rail CPRO: In view of BEST buses strike Mumbai Division will run extra sub-services.
— ANI (@ANI) January 10, 2019
Main line-
Thane dep 13.44hrs&CSMT arrival 14.40hrs
CSMT dep 14.49hrs&Kalyan arrival 16.15hrs
Harbour line-
Vashi dep 13.44hrs&CSMT arrival 14.32hrs
CSMT dep14.45hrs&Panvel arrival 16.05
बेस्टचे सहा कोटींचे नुकसान
बेस्ट उपक्रमाला दररोज प्रवासी भाड्यातून तीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दोन दिवसांत एकही बस आगाराबाहेर न पडल्यामुळे बेस्ट उपक्रमाचा दोन दिवसांचा महसूल बुडाला. बुधवारी (9 जानेवारी) वडाळा, वरळी, वांद्रे आगारातील ११ बसगाड्या सकाळी बस आगाराबाहेर पडल्या. मात्र या बसगाड्याही काही तासांनी बस आगारांमध्ये परतल्या.