मुंबई - बेस्टनं पुकारलेल्या संपाचा फटका मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे, दिंडोशी, गोरेगाव, ओशिवरा, मालाड, पोयसर, मागाठाणे, दहिसर या बस आगारांतून एकही बस सोडण्यात आलेली नाही. बेस्ट चालक-वाहक संपामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. परिणामी, पश्चिम उपनगरातील बस सेवाच ठप्प झाली आहे. त्यामुळे स्टेशनपासून दूरवर राहणाऱ्या आणि रोज बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे, शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तर दुसरीकडे, बेस्टच्या संपाचा फायदा घेत रिक्षा चालकांनी प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांकडून अव्वाच्या-सव्वा भाडे उकळले जात आहे. शेअर रिक्षाचालकांकडून आज 30 रुपये भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. दरम्यान, बेस्ट संपामुळे आज अनेक विद्यार्थी शाळा तसंच कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत.
(Live : बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार, सर्वसामान्य वेठीस)
(Bharat Bandh Live: ओडिसामध्ये हिंसक आंदोलन; प. बंगालमध्ये TCM-CPM कार्यकर्ते भिडले)
दरम्यान, बेस्ट संपामुळे वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोने प्रवास करणे अनेक प्रवाशांनी पसंत केले आहे. यामुळे नेहमीपेक्षा आज मेट्रोमध्ये तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. तसंच या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून मुंबई मेट्रो वन कंपनीकडून सकाळपासूनच मेट्रोच्या अतिरिक्त जादा फेऱ्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर सोडण्यात आल्याची माहिती मेट्रो प्रवक्त्याने 'लोकमत'ला दिली आहे.
काय आहेत मागण्या?
सुधारित वेतन करार
दिवाळीचा बाेनस
कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न साेडविणे
बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण
कारवाई होणार
संपात सहभागी होणाऱ्या कर्मचा-यांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्र्रकुमार बागडे यांनी दिला आहे. आश्वासनावरच बोळवण गेले अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. मात्र, कामगारांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. दरवर्षी आश्वासनावरच बोळवण होत आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप टळणार नाही, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.
शिवसेनेचा नैतिक पाठिंबा
सत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, कामगारांचा कौल संपाच्या बाजूने असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे या संपाला शिवसेना नेत्यांनी नैतिक पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या वर्षी कामगारांनी पुकारलेला संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कामगारांनी मागे घेतला होता. त्यामुळे पुन्हा संप होऊ नये, यासाठी शिवसेना नेत्यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, बेस्ट प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी जादा गाड्या सोडण्यासाठी एस.टी. महामंडळाला पत्र पाठविले असल्याचे बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, ९५ टक्के कामगार संपाच्या बाजूने असल्यामुळे बससेवेवर परिणाम होणार आहे.