बेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 05:15 AM2019-08-21T05:15:58+5:302019-08-21T05:20:01+5:30

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी बेस्ट वर्कर्स युनियन या बेस्ट उपक्रमातील मान्यताप्राप्त संघटनेने ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला होता.

Best strike postpone; Decision only after knowing the opinion of the workers on August 23th | बेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय

बेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय

Next

मुंबई : नवीन वेतन कराराबाबत बेस्ट प्रशासन आणि मान्यताप्राप्त संघटनेबरोबर सुरू असलेल्या बैठकीतून अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे २३ ऑगस्ट रोजी कामगारांचे मतदान घेऊन संपाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी मंगळवारी कामगार मेळाव्यात जाहीर केले. तोपर्यंत मंगळवार मध्यरात्रीपासून पुकारलेला बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलण्यात आला आहे.
सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी बेस्ट वर्कर्स युनियन या बेस्ट उपक्रमातील मान्यताप्राप्त संघटनेने ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला होता. मात्र, बेस्ट प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा सुरू असल्याने, संप २० आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. या कालावधीत बेस्ट प्रशासनाकडून कामगारांच्या वेतन कराराबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे राव यांनी सांगितले.
तरीही तूर्तास संप पुढे ढकलण्यात आला आहे. २३ आॅगस्ट रोजी कामगारांचे मतदान घेणयात येणार आहे. त्यानंतरच संप करावा अथवा करू नये, याबाबत निर्णय घेतला जाईल. परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये मंगळवारी संध्याकाळी यासंदर्भात बेस्ट कामगार कृती समितीच्या वतीने आयोजित कामगार मेळाव्यात याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतरच संप पुढे ढकलण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.
याचसाठी संपाची हाक
बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांनी जून महिन्यात सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत. मात्र, त्यानंतर एक महिना उलटला, तरी प्रशासन चर्चेला बोलवित नसल्याने संतप्त झालेल्या बेस्ट वर्कर्स युनियनने ६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. मात्र, अद्याप कोणताच प्रस्ताव बेस्ट प्रशासनाकडून न आल्यामुळे संपाशिवाय पर्याय नाही, असे मत कामगार नेते व्यक्त करीत आहेत.
न्यायालयीन लढ्यानंतरही निर्णय नाहीच
सुधारित वेतनश्रेणी, कामगार वसाहतींची दुरुस्ती आदी मागण्यांबाबत बेस्ट कामगार संघटनांनी जानेवारी महिन्यात संप पुकारला होता. हा संप नऊ दिवस चालल्यानंतर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थीच्या माध्यमातून बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये वाटाघाटी सुरू झाली. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने, मुंबईकरांवर बेस्टच्या संपाची टांगती तलवार आहे.

शिवसेनेला हाताशी धरून टाळाटाळ - राव
बेस्ट प्रशासन शिवसेनेला हाताशी धरून कामगारांच्या कराराबाबत टाळाटाळ करीत आहे. म्हणूनच २१, २२, २६ आॅगस्ट रोजी अन्य संघटनांना चर्चेसाठी बोलावले असल्याचा आरोप राव यांनी केला आहे.
पूरग्रस्तांना बेस्ट कामगारांची मदत
बेस्ट कामगारांकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा प्रस्ताव मेळाव्यात मंजूर करण्यात आला.

Web Title: Best strike postpone; Decision only after knowing the opinion of the workers on August 23th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट