आधीच बेस्ट संप; तशात मेगाब्लॉक झाला; प्रवाशांच्या नशिबी रविवारी फक्त ‘हलाहाल’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 07:26 AM2023-08-07T07:26:57+5:302023-08-07T07:27:09+5:30
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल चालू असून त्यातच रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर असलेल्या मेगाब्लॉकने प्रवाशांची आणखी त्रेधा उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या दिवसापासून सुरू असेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपामुळे मुंबईकरांचे अगोदरच हाल होत असताना रविवारी रेल्वेकडून घेण्यात आलेल्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांची चांगलीच कोंडी झाली. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेतल्यामुळे सुट्टीच्या दिवशी प्रवाशांना प्रचंड लोकलगर्दीचा सामान करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल चालू असून त्यातच रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर असलेल्या मेगाब्लॉकने प्रवाशांची आणखी त्रेधा उडाली. या स्थितीमुळे ‘हलाहाल’ पचविण्याचे दिव्यकर्म मुंबईकरांना करावे लागत होते.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी साडेआठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात आले. यामुळे धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून वळविली होती. यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग स्थानकांतील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे वाशी ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद होती.
प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील, असे सांगण्यात आले होते; पण, या लोकलची संख्या खूपच कमी होती.