Join us

बेस्ट संप अखेर मागे; बँक खात्यात बोनसचे साडेसात हजार रुपये जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 8:03 AM

बोनस दिला नाही म्हणून शनिवारी सांताक्रूझ आगारातील कंत्राटी कामगारांनी आंदोलन केले होते.

मुंबई : बेस्टच्या कंत्राटी कामगारांची दिवाळी अखेर गोड झाली. खात्यात बोनसचे ७ हजार ५०० रुपये जमा झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप रविवारी मागे घेतला. संप मागे घेतल्याने प्रतीक्षानगर, मजास आगारातील २०० बसेस रस्त्यांवर धावल्या.

बोनस दिला नाही म्हणून शनिवारी सांताक्रूझ आगारातील कंत्राटी कामगारांनी आंदोलन केले होते. त्यामुळे १०० बसेस सांताक्रूझ आगारातच उभ्या राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. सांताक्रूझ आगारापाठोपाठ रविवार सकाळपासून प्रतीक्षानगर आणि मजास आगारातील ११०० कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अखेर कंपनीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे मान्य केले. बोनसची रक्कम काही कर्मचाऱ्यांच्या खात्यातही जमा झाली. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. 

महिन्याभरापूर्वी एम. पी. ग्रुप या ठेकेदाराने काम बंद आंदोलन केले होते. आता मातेश्वरी या कंपनीने कामगारांना बोनस नाकारला. बेस्ट प्रशासन याला कारणीभूत असून बेस्टचे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विलीनीकरण हा एकमेव पर्याय आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांकडेही बेस्टने लक्ष द्यावे, अशी मागणी मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनी केली आहे. 

सांताक्रूझ आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांना ओला-उबर वा टॅक्सीचा पर्याय जवळ करावा लागला होता. संप मिटल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

टॅग्स :बेस्ट