मुंबई : बेस्टच्या परंपरेप्रमाणे टाटा कंपनीकडून वीज खरेदी न करता या वेळेस खुल्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र रिलायन्स अथवा अदानी कंपनीला मदत करण्याचा तर हा प्रयत्न नव्हे, असा संशय बेस्ट समिती सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी व्यक्त केला. परंतु ग्राहकांना स्वस्त दरात वीजपुरवठा करता यावा म्हणून वीज कंपन्यांकडून खुल्या निविदा मागविण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागामार्फत कुलाबा, चर्चगेट ते सायन, माहीमपर्यंत १० लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. हा विभाग नफ्यात असल्याने बेस्टचा डोलारा अद्याप उभा आहे. आतापर्यंत बेस्ट टाटा कंपनीकडूनच या ग्राहकांना वीजपुरवठा करीत होती. याबाबतचा करार मार्च २०१८ रोजी संपुष्टात येत आहे. मेट्रो रेल्वेसारख्या पायाभूत आणि पुनर्विकासाच्या प्रकल्पांमुळे दक्षिण मुंबईत विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट टाटा कंपनीकडून वीज खरेदी करण्याऐवजी बेस्टने खुल्या निविदा मागविल्या. यावर बेस्टचे महाव्यस्थापक सुरेंद्र बागडे यांनी सांगितले की, वीज ग्राहकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध व्हावी म्हणूनच खुल्या निविदा काढून वीज खरेदी केली जाणार आहे. मुंबईला ३५०० ते ३६०० मेगावॅट विजेची गरज आहे. त्यापैकी २००० मेगावॅट वीज मुंबईबाहेरून विकत घेतली जाते. ती वीज मुंबईच्या हद्दीपर्यंत आणण्याचे काम संबंधित कंपनी करते. त्यानंतर मात्र शहरात बेस्टकडून ही वीज इतर ठिकाणी पुरवली जाते. यामुळे जी कंपनी दारापर्यंत वीज आणून देईल आणि ज्याचे दर कमी असतील अशा कंपनीला वीजपुरवठ्याचे काम देण्यात येईल, असे बागडे यांनी स्पष्ट केले.तीन टप्प्यांत निविदा-मुंबईकर नागरिकांना स्वस्त वीज मिळावी म्हणून ७५० मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी तीन टप्प्यांत निविदा काढण्यात आल्या आहेत.टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनी लि. आणि टाटा पॉवर कंपनी लि. या दोन कंपन्यांनी प्रत्येकी २५० मेगावॅट आणि १५० मेगावॅट विजेसाठी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता.बेस्टने निविदेसाठी केलेल्या नियमानुसार एकाच व्यक्तीची एका कंपनीत ५० टक्क्यांहून अधिक मालकी असल्यास त्या कंपनीला टेंडर प्रक्रियेतून बाद करण्याच्या नियमामुळे टाटाला निविदा प्रकियेत सहभाग घेता येणार नसल्याचे कळविले आहे.टाटा पॉवरने बेस्टमार्फत सुरू झालेल्या २५० मेगावॅट स्पर्धात्मक वीज खरेदीच्या ई-निविदा प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्य वीज नियामक आयोगाकडे केली होती. यामुळे पुढील करार होईपर्यंत सहा महिने टाटाकडून वीज घेण्यासाठी नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे बागडे यांनी सांगितले.
स्वस्त विजेसाठी बेस्टमार्फत खुल्या निविदा, थेट खरेदीची परंपरा पहिल्यांदाच मोडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 2:02 AM