Join us

बेस्टचा प्रवास महागणार?

By admin | Published: April 02, 2017 9:52 AM

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला अडचणीतून बाहेर काढण्याठी भाडेवाडीचा प्रस्ताव सूचवण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला अडचणीतून बाहेर काढण्याठी भाडेवाडीचा प्रस्ताव सूचवण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात बेस्टचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांची  बेस्टच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी काल बैठक झाली. या बैठकीत बेस्टच्या किमान भाडेवाढीबाबत चर्चा झाली. यावेळी बेस्टच्या किमात भाड्यात दोन रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.  
मुंबईतील अंतर्गत प्रवासी वाहतुकीचा बहुतांश भार उचलणारा बेस्ट उपक्रम गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पन्नाहून खर्चच अधिक असल्याने बेस्टचा वाहतूक विभाग तुटीत आहे.  कर्जाचे डोंगर वर्षागणिक वाढत असल्याने बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची वेळ आली आहे. कामगारांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यासाठी बेस्टकडे पैसे नव्हते. 
अशा परिस्थितीत बेस्टच्या वाहतूक विभागाला सावरण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली होती. त्यानुसार काल कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी पालिकेच्या गटनेत्यांची काल बैठक झाली. यावेळी बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला.  किमान प्रवासी भाड्यात 2 रुपयांनी वाढ करण्याची सूचना या प्रस्तावात करण्यात आली. 
मात्र भाडेवाढ झाल्यास प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याआधी बेस्टची भाडेवाढ झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रवासी खाजगी वाहतुकीच्या पर्यायांकडे वळले होते. तसेच खाजगी वाहतूक, मेट्रो आणि मोनो रेल यामुळे बेस्टचे प्रवासी मोठ्या प्रमाणात घटले आहेत.  मात्र काल झालेल्या बैठकीत भाडेवाढीवर चर्चा झाली असली तरी त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.