Join us  

स्वमग्न व्यक्तींसाठी बेस्ट होणार प्रवास; बेस्ट उपक्रमातून दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच सुविधा मिळणार

By सीमा महांगडे | Published: December 08, 2023 6:34 PM

 बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवासी,जेष्ठ नागरीक आणि महिला प्रवाशांकरिता यापूर्वीच आसने राखीव ठेवण्यात आलेली आहेत.

मुंबई:   बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवासी,जेष्ठ नागरीक आणि महिला प्रवाशांकरिता यापूर्वीच आसने राखीव ठेवण्यात आलेली आहेत. दरम्यान आता दिव्यांग प्रवाशांप्रमाणेच समस्यांना सामोरे जाणाऱ्या ऑटिस्टिक (स्वमग्न) व्यक्तींच्या समस्यांची बेस्ट उपक्रमाने दखल घेतली असून दिव्यांग व्यक्तीप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सद्यस्थितीत ४०१ व त्यापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना बेस्ट उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करताना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आलेली आहे. शिवाय पुढील दरवाज्याने प्रवेशाच्या अनुमतीसह राखीव आसनांची सुविधा देखील उपलब्ध आहे. 

बेस्ट उपक्रमात दिव्यांग प्रवासी, जेष्ठ नागरीक, गरोदर स्त्रिया आणि तान्ह्या बाळासह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना उपक्रमाच्या बस गाड्यांमध्ये पुढील दरवाज्याने प्रवेशाची अनुमती देण्यात आलेली आहे. शिवाय ४०% व त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येते. याचप्रमाणे येत्या सोमवारपासून म्हणजेच ११ डिसेंबरपासून ही सुविधा उपलब्ध ऑटिस्टिक व्यक्तींसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

मोबाईल अॅप'च्या माध्यमातून सुविधा प्राप्त होणार 

बेस्ट उपक्रमाची सुविधा प्राप्त होण्यासाठी ऑटिस्टिक व्यक्तींनी संबंधित वैद्यकीय शासकीय अधिका-यांकडून त्यांच्या आजारपणाबाबत प्रमाणपत्र उपलब्ध करणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्राच्या सहाय्याने बेस्ट उपक्रमाच्या बस आगारातून ऑटिस्टिक व्यक्तीना त्यांच्याकरीता उपलब्ध केलेला स्मार्टकार्डवर आधारीत बसपास अथवा 'मोबाईल अॅप'च्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होईल. या बसपासची मुदत एक वर्ष राहील, एक वर्षानंतर नव्याने प्रमाणपत्र सादर केल्यावर बसपासचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ऑटिस्टिक व्यक्तीनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे.